पनवेलमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची देखभाल व आवश्यक कामांमुळे गुरुवार, 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवार, 13 मार्च रोजी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या कालावधीत शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार असला तरी काही उंच जलकुंभांमधून मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, 12 मार्च रोजी हरिओमनगर उंच जलकुंभ, ठाणानाका रोड उंच जलकुंभ, एचओसी उंच जलकुंभ, चौकोनी टाकी, मार्केट यार्ड उंच जलकुंभ तसेच पटेल मोहल्ला उंच जलकुंभ येथून पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. मात्र, उर्वरित भागातील पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवार, 13 मार्च रोजी गंगाराम सिनेमा उंच जलकुंभ, भाजी मार्केट उंच जलकुंभ तसेच सर्व्हिस होद गोल उंच जलकुंभ येथून पाणीपुरवठा सुरू राहील, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही पुढील चार ते पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मिळणारे पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन शहर अभियंत्यांनी केले आहे.

Exit mobile version