। उरण । वार्ताहर ।
उरण शहराला जानेवारी महिन्यापासून मंगळवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे उरण शहरावर पाणी टंचाईचे संकट आले होते. उरण शहरातील प्रभागात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले होते. याची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील यानी घेतली. यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संतोष माळी यांची शिष्टमंडळ समवेत भेट घेऊन अनियमित पाणीपुरवठा व शहर समस्येबाबत 8 मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. पाणीपुरवठा सुरळीत करावा व शहरवासीयांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठा विषयी व्यथा मांडली.
याची दखल घेऊन शहराला मंगळवारी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. शेकापच्या पाठपुरावामुळे पाणी पुरवठा सुरळीत केल्याबद्दल शहर चिटणीस शेखर पाटील सहचिटणीस यशवंत ठाकूर, चिंतामण गायकवाड, शंकर भोईर, नारायण पाटील यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्याचबरोबर दिलेल्या निवेदनातील समस्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. शेकापच्या प्रयत्नाने मंगळवारी पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.







