वेळापत्रकानुसार खारेपाटात होणार पाणीपुरवठा

आमदारसाहेब आहात कुठे?; खारेपाटाची आर्त हाक
| पेण | प्रतिनिधी |

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांनी ट्रकभर आश्‍वासनांची खैरात खारेपाटात पाणीपुरवठ्यासंदर्भात केले होती. खारेपाटातील भोळ्याभाबड्या जनतेने आश्‍वासनाला बळी पडून सढळ हाताने मतदान केले; परंतु निवडून आल्यावर त्यातील एकही आश्‍वासन आमदार रवींद्र पाटील यांना पूर्ण करता आले नाही. त्यामुळे खारेपाटातील जनतेला आपली फसवणूक झाल्याची समजून चुकले आहे. खारेपाटात ढुंकूनही आमदार फिरकत नसल्याने खारेपाटातील जनता विचारत आहेत, ‘आमदारसाहेब आहात कुठे, पाण्याविना जीव तळमळत आहे’…


पेण तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. एकीकडे नवी मुंबईला पाणीपुरवठा करूनदेखील तुडुंब भरलेले हेटवणे धरण असताना, पेण तालुक्यात मात्र एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती भयावह असून, सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.


ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या शहापाडा धरणातील पाणी संपले आहे. मशीनद्वारे कालव्यातून पाणी उचलून शहापाडा धरणामध्ये साठवले जात आहे. आणि, साठवलेले पाणी नंतर पुढे खारेपाटात पाठवले जात आहे. यामुळे वाशी व शिर्की, तसेच धोंडपाडा व कोप्रोली विभागातील गावांना दर सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन शहापाडा धरणातील पाण्याची पातळी पूर्ववत होण्यासाठी साधारण जुलै महिना उजाडत असल्याने, खारेपाटातील नागरिकांनी काय करायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


पुढील वेळापत्रकानुसार होणार पाणीपुरवठा
दि. 10 मे सकाळ 5 ते रात्री वाजेपर्यत उंबर्डे, पिंपळपाडा, धोडपाडा, कोप्रोली, उंबर्डे फाटा, उंबर्डे बौद्धवाडी. रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत रोडे, काश्मीरे वाडी, कोळी वाडा, बौद्धवाडी, मोहल्ला, वाशी जुनी पाइपलाइन, कांदळे पाडा, बौद्धवाडी.

दि. 11 मे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उचेडे, मलेघर, कांदळे पाडा, संध्याकाळी 6 ते 9 कांदळे, आदिवासीवाडी, रात्री 12 ते सकाळी 11 वाजेपर्यंत वडखळ, वडखळ नाका, वावेे, इंद्रनगर, घोलनगर, कुंदाताई नगर, बापदेव वाडी, बौध्दवाडी.

दि. 12 मे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोळवे, बेणेघाट, शिगणवट, बोरी, जुनी बोरी, संध्याकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत बोर्वे, मसद बु., मसद खु., रात्री 1 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कोळवेसाठा विहीर, शिर्की, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाशी, सरेभाग, ओढांगी.

दि. 13 मे संध्याकाळी 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत कणे, बोर्झे, बोर्झे फाटा.

दि. 14 व 15 मे रात्री 1, दुसर्‍या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत वढाव, मोठे वढाव, दिव, काळेश्री, कान्होबा, नारवेल, बेनवले, पेरणकर वाडी, जनवली, भाल, विठ्ठलवाडी, लाखोले, ठाकूर बेडी, मंत्री बेडी, दिव बेडी, तुकाराम वाडी, नरदास वाडी, वर्तकनगर.

दि. 16 मे रात्री 2 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जुनी वाशी लाईन.

अनेक वर्षे पाणीटंचाईचा सामना करतोय. आतापर्यंत दोन-तीन दिवसाआड अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होत होता. आता सहा दिवसांनी नळाला पाणी येणार आहे. सहा दिवसांसाठी पाणी साठवायचे कसे? असा प्रश्‍न पडला आहे.

Exit mobile version