सरसगडावरील पाण्याचे टाके पुनर्जिवित

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशनच्या किल्ले सरसगड संवर्धन सुवर्ण महोत्सवी मोहीमेनिमित्त सुधागड तालुक्यातील किल्ले सरसगडावरील पाली दरवाजाकडील नैऋत्य दिशेला असलेल्या बुरुजावरील पाण्याचे टाके साफ करण्यासाठी सर्व दुर्ग संवर्धन संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते.

मोहीम क्रमांक 50 आणि 51 या मोहिमांमध्ये बा रायगड परिवार, स्वराज्यसेवक प्रतिष्ठान मावळा प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, टीम दातेगड, टीम कोहोज, दुर्गवीर प्रतिष्ठान, दूर्गरत्न प्रतिष्ठान, स्वराज्याचे वैभव, गडकरी प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. तसेच, दोन दिवसांत तब्बल तीन टन गाळ व दगड टाक्यातुन बाहेर काढण्यात आला असून हे पाण्याचे टाके पुनूर्जिवित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक नितेश देसाई यांनी सहभागी सर्व संस्थांचे आभार मानले व सरसगडला सरस करायला इथून पुढेही हातभार लावण्यासाठी आवाहन केले.

पुरातन वस्तूचा शोध
या गाळातून जवळपास 8 दगडी गोळे, एक कांस्य वाटी, एक तांब्याची छोटी झाकणी, शिसे धातूची तार, एक चांदीची जोडवी, एक छोटे शिवलिंग व दोन घमेले मडक्यांचे खापर शोधण्यात यश आले. हा सर्व ऐवज पुढील संशोधनासाठी दुर्गवेध संस्थेने आपल्या ताब्यात घेतला आहे.
Exit mobile version