दुर्गवीर प्रतिष्ठानकडून पाण्याचे मोठं टाक स्वच्छ
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील भेलीव गावाजवळील मृगगड किल्ल्यावर नुकतेच दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पाण्याचे मोठं टाक स्वच्छ करण्यात आले. तसेच सदर व जोती मोकळ्या करण्यात आल्या.
यावेळी मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात आली. एकीकडे गडावरील पाण्याच्या मुख्य बांधीव टाक्यातील दगड व माती जाळीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच दगडांचे वर्गीकरण करुन सुव्यवस्थित ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे गडावरील सदर व जोती या भागात वाढलेले गवत काढून ते अवशेष मोकळे करण्यात आले. या मोहिमेत मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड व पुणे या विभागातून एकूण 48 शिलेदारांनी सहभाग घेतला होता. महिलांचा देखील उल्लेखनीय सहभाग होता.
गेली कित्येक मोहिमेतंर्गत या बांधीव टाक्यात दुर्गवीर काम करत आहेत. पूर्णपणे दगड मातीने भरलेले टाक आता मोकळा श्वास घेत आहेत. अशा अनेक अपरिचित गडकिल्ल्यांवर दुर्गवी प्रतिष्ठान तर्फे संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता.
– अर्जुन दळवी, सदस्य दुर्गवीर प्रतिष्ठान