| उरण | वार्ताहर |
बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी येत्या 17 फेब्रुवारीपासून मुंबईकर आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन होईल. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि सिडको यांच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या या वॉटर टॅक्सीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. परंतु, कोरोनामुळे उद्घाटन लांबले. आता मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.
असे असणार भाडे
डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूरमार्गे पुढे माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि एलिफंटापर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाला 290 रुपये आकारण्यात येतील, तर महिन्याच्या पासासाठी 12 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. तर बेलापूर आणि एलिफंटापासूनच्या परतीच्या प्रवासाला 825 रुपये आकारण्यात येतील, असे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी म्हणाले.
तीन मार्गांवर चालतील टॅक्सी
फेरी वार्फ, माझगाव येथील क्रूझ टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल
बेलापूर आणि एलिफंटा लेणी
बेलापूर आणि जेएनपीटी
भविष्यातील मार्ग
भविष्यात अजून काही मार्गांचा विस्तार केला जाईल. इतर मार्गांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते रेवस, करंजाडे, धरमतर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, वाशी आणि ऐरोली, डीसीटी ते खांदेरी बेटे आणि जेएनपीटी यांचा समावेश आहे.
आसन क्षमता
वॉटर टॅक्सी सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपनीला दिली आहे. पहिल्या टप्प्यात 32 आसनी, 40 आसनी आणि 50 आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई-एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे.
15 मिनिटांत मुंबई
वॉटर टॅक्सीचा वापर वाढल्यास मुंबईकरांचा इंधनावर होणार खर्च, तसेच रस्तेवाहतुकीत होणारी वाहतुक कोंडी, रेल्वेतील गर्दी आणि इतर बर्याच त्रासांपासून सुटका होऊ शकणार आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई ते नवी मुंबई हा जलप्रवास वॉटरटॅक्सीने केल्यास तो अवघा 15-20 मिनिटांचा असेल. नवी मुंबईतून मुंबई शहरात कामधंदा आणि नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सेवेसाठी सुखकर मार्ग निवडण्याचे प्रयत्न पाठीमागील प्रदीर्घ काळापासून सुरु होते.