वॉटर टॅक्सी सेवा होणार स्वस्त

। उरण । वार्ताहर ।
मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या वॉटर टॅक्सीतून प्रवास करणे आता स्वस्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात वॉटर टॅक्सींच्या वापराला चालना देण्यासाठी वॉटर टॅक्सीवरील कर तीन वर्षांसाठी माफ केला आहे. यानंतर वॉटर टॅक्सीचे भाडे 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास कमी वेळात पूर्ण करता येणार आहे, असे असतानाही वॉटर टॅक्सींना दररोज अपेक्षेपेक्षा कमी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांना तीन वर्षांसाठी करात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर अधिकाधिक लोकांना शहरात येण्यासाठी कमी भाडे द्यावे लागेल, अशी अपेक्षा आहे. एका अहवालात, एका वॉटर टॅक्सी ऑपरेटरने सांगितले की, या सेवेसाठी मेरी टाईम बोर्डला 10 टक्के कर भरावा लागेल. करात सूट मिळण्याचा परिणाम भाड्यावरही होणार असून भाडे 10 टक्क्यांनी कमी होणार आहे.

Exit mobile version