ठेकेदार मिळत नसल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील वॉटर व्हेंडिंग मशीन बंद

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकात वॉटर व्हेडिंग मशीन आहे. सध्या ती बंद आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला विचारले असता ठेकेदार मिळत नसल्याने ही वॉटर व्हेंडिंग मशीन बंद असल्याचे रेल्वे प्रशासनाने लेखी कळविले आहे. हे मशीन बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, पाण्यासाठी नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वी कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले होते. या वॉटर व्हेंडिंग मशीनमधून पाणी मिळत असे. पाणी रिफील करून हवे असल्यास 300 मिलीसाठी 1 रुपया, 500 मिलीसाठी 3 रुपये, 1 लीटरसाठी 5 रुपये, 2 लीटरसाठी 8 रुपये, 5 लीटरसाठी 20 रुपये तसेच कंटेनरमध्ये पाहिजे असल्यास म्हणजे पाऊच किंवा बाटलीसहित पाहिजे असल्यास 300 मिलीसाठी 2 रुपये, 500 मिलीसाठी 5 रुपये, 1 लीटरसाठी 8 रुपये, 2 लीटरसाठी 12 रुपये, 5 लिटर साठी 25 रुपये असा दर आकारण्यात येत होता.

स्वच्छ व निर्भेळ पाणी मिळत असल्याने प्रवासी खास करून गरीब प्रवाशांना याचा खूप उपयोग होत असे; परंतु काही दिवसांपासून वरील वॉटर व्हेंडिंग मशीन बंद असल्याने प्रवासी वर्गाची फारच गैरसोय होत आहे. याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता प्रशासनाने सदर वॉटर व्हेंडिंग मशीनसाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे ही मशीन सुरू करण्यात येत नाही. रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना पाठविलेल्या उत्तरात असे म्हणते आहे की, याबाबतीत कर्जत येथील वॉटर व्हेंडिंग मशीन पुन्हा सुरू करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने दि. 3 जून, 28 जून, 26 जुलै, 22 ऑगस्ट रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या; परंतु याबाबतीत एकही ठेकेदार पुढे न आल्यामुळे वॉटर व्हेंडिंग मशीन सुरू करणे शक्य नाही, असे कळविले आहे.

अगदी एक रुपयापासून पाणी मिळत असल्याने गरीब प्रवाशाची चांगली सोय होत होती; परंतु ती आता बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबतीत निविदेतील काही नियम शिथिल केल्यास ठेकेदार ठेका घेण्यास पुढे येतील.

पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत
Exit mobile version