| खांदेश्वर | प्रतिनिधी |
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पुढील वर्षातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत अधिसूचना काढली आहे. मात्र, दुसरीकडे पालिका मुख्यालयासमोरील महात्मा गांधी उद्यानात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
पनवेल महापालिका पाणी बचतीचे आवाहन करीत असताना उद्यानात मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी मारले जात आहे. काही ठिकाणी तर पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. सध्या डेंग्यूच्या डासांमुळे नागरिक हैराण झाले असताना उद्यानातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. या उद्यानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या उद्यानासाठी लागणारे पाणी शेजारील सरोवरातून घेतले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प अनेक वर्षांपासून सुरू असतानाही त्यातील प्रक्रिया केलेल्या पाण्याची जोडणी अद्याप उद्यानापर्यंत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या या उद्यानातील पाण्याच्या जुन्या जोडण्या तोडण्यात आल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे उद्यानाच्या देखभालीसाठी आजही सरोवरातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सरोवरातील पाणीसाठा कमी झाला तरी उद्यानासाठी पाणी वापरण्याचा प्रश्न कायम राहणार आहे.
पनवेल पालिकेकडून पाण्याची उधळपट्टी
