अलिबाग – मुरुडमधील धबधबे धरणे पर्यटनासाठी बंद

अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांचे आदेश

रायगड |जिल्हा प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील .सर्व धरणे, धबधबे आणि धोकादायक पर्यटनस्थळे 30 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. या भागात प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी जारी केले आहेत.


पावसाच्या कालावधीमध्ये धोकादायक होत असलेल्या पर्यटनस्थळी मद्यपान करणे. धबधबे, दऱ्यांचे कठडे, धरणे, मुलांचे कठडे, धोकादायक वळणे अशा अनेक ठिकाणी सेल्फी काढणे, खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या धोकादायक पडणाऱ्या झोपा खाली बसणे असे प्रकार रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यात घडत असतात. त्यामुळे जीवितहानीचा प्रश्न गंभीर निर्माण होतो.
पावसाळी हंगामात अलिबाग व मुरुड तालुक्यातील धरण व धबधबे तसेच लहान मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असणाऱ्या परिसरात पर्यटनासाठी बंदी असल्याचे आदेश अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुख्य चव्हाण यांनी काढले आहेत.


सलग पावसामुळे दरड कोसळणे, पूरपरिस्थिती, खोल पाण्यात बुडण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव आणि सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व पर्यटकांनी आणि स्थानिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या गोष्टींना सक्त मनाई
धबधबे, धरणे, द-यांच्या काठावर जाऊन सेल्फी काढणे, फोटो/रील्स काढणे.
पावसाच्या पाण्यात उतरणे, पोहणे किंवा धबधब्याच्या झोतात बसणे.
मद्यपान करणे, मद्याची वाहतूक/विक्री करणे.
धोकादायक ठिकाणी गाडी थांबवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे.
महिलांची छेडछाड, असभ्य वर्तन, डी.जे. लावून ध्वनि प्रदूषण करणे.
धरण/धबधब्याच्या 1 किमी परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंद.

Exit mobile version