कोसळणार्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पोलादपूर शहरामध्ये अंडरपासच्या खंदकातून कशेडी घाटाकडे मार्गस्थ होत असताना एलअँडटी या ठेकेदार कंपनीने या अंडरपास महामार्गावर पाच व्हेईकल ब्रिजेस बांधले असून, या ब्रिजवरून कोसळणार्या पाण्यामुळे धबधब्यांचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यापूर्वी एलअँडटी ठेकेदार कंपनीने या अंडरपास राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गिका दुहेरी वाहतुकीस खुली केल्यानंतर या धबधब्यांखालून पाण्याचा मारा झेलत जाणार्या वाहनांना भविष्यात पाण्यासोबत दगड व स्लॅबचे काँक्रिट तसेच स्टीलचे तुकडे झेलावे लागल्यास मोठा धोका निर्माण होणार आहे. पोलादपूर एस.टी. स्थानक परिसराबाहेर सैनिकनगर गोकुळनगर रस्त्यापासून छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या मागील बाजूपर्यंत तब्बल पाच व्हेईकल ब्रिजेस एलअँडटी या ठेकेदार कंपनीने या अंडरपास राष्ट्रीय महामार्गावर उभारले असून, यापैकी चार पुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. पाच ते दहा मिनिटे पाऊस पडल्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळयामागील ब्रिजवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साठत असून, या पाण्याची पातळी वाढली की अंडरपासमधील राष्ट्रीय महामार्गावर या पाण्याचे लोट धबधब्यासारखे कोसळत आहेत. यावेळी खाली महामार्गावरून जाणार्या वाहनांवर या पाण्यासोबत सिमेंट काँक्रिटचे तसेच स्टीलचे तुकडे कोसळून आदळले तर वाहनांचे नुकसान होऊन आतील प्रवाशांनाही इजा पोहोचू शकते.
पावसाळयापूर्वी पोलादपूर शहरात एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने वाहतूक पोलीस व पोलादपूर पोलीस यांच्या उपस्थितीत या अंडरपास राष्ट्रीय महामार्गाची एक मार्गिका खुली केल्यानंतर मार्गिकेचे काम निकृष्ट असल्याचे तसेच काँक्रीटीकरणाच्या महामार्गातील खडी व सिमेंट उकरले जात असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनी केले. अलिकडेच, दिवसांतून केवळ पाच ते दहा मिनिटे पाऊस पडूनदेखील साचणार्या पाण्यामुळे अंडरपासमध्ये धबधब्यासारखे 35 फुटांवरून पाणी कोसळत असल्याबद्दलही दरेकर यांनी आवाज उठविला असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याची घाई का करण्यात आली, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केला आहे.
नजिकच्या काळात पोलादपूर एस.टी.स्थानकातील नवीन स्वच्छतागृहांचे सांडपाणी पुन्हा पूर्वेकडील सर्व्हिसरोडलगतच्या गटारांतून वाहून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना हा सर्व्हिसरोड हे सांडपाणी जमिनीमध्ये जिरून कमकुवत होणार असून अंडरपासच्या लालमातीच्या बॉक्सकटींगवरील सिमेंटफोमचे फवारे कोसळून लालमातीचे ढिगारेदेखील अंडरपास राष्ट्रीय महामार्गावर कोसळणार असल्याचे यावेळी जाणवत असून या अंडरपासमध्ये गटारांची सुविधा नसल्याने हे पावसाचे पाणी थेट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर साचून नदीसदृश्य परिस्थितीदेखील उदभवण्याची शक्यता आहे.