फॉनच्या टीमचा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम
निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमींकडून फॉनच्या उपक्रमांचे कौतुक
| उरण । वार्ताहर ।
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फ्रेंड्स ऑफ नेचर या निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी संस्थेच्या वतीने आगळीवेगळी धुळवड साजरी करण्यात आली. फ्रेंड्स ऑफ नेचर,(फॉन) चिरनेर उरणचे सदस्य व काही समविचारी निसर्गमित्र यांना सोबत घेऊन संघटनेचे सदस्यांनी या वर्षीही वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झर्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य केले. एक आगळीवेगळी धुळवड व फॉनची सृष्टी ठाकूरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पशु पक्षांसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करून त्यांचे तहान भागविण्याचा प्रयत्न या सामाजिक उपक्रमातून करण्यात आला.
चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून झर्यास पुनर्जीवित केले. या पाणवठ्याचा अनेक वर्षापूर्वी तिथे असणार्या आदिवासी कातकरी समाजाच्या वस्तीकडून पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत होता. पण आता त्या पाणवठ्याचे पाणी तेथील आदिवासी बांधव वापरत नसल्याकारणाने हा पाणवठा गाळाने बुजला गेला होता.
मागील वर्षीही संस्थेने त्यातील गाळ काढून वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सदर परिसरात अनेक दुर्मीळ वावर व अस्तित्व अजूनही टिकून आहे. त्यात अनेक जीव असे आहेत ज्यांचे अस्तित्वच देशाच्या इतर भागातून नष्ट होत चालले आहेत. उरणच्या सर्व भागात विकासाच्या नावाखाली निसर्गाची जी भयानक कत्तल होतेय, वणवे लावून सर्व वनसंपदा नष्ट करून व डोंगरातील माती चोरून त्यांना उघडे- बोडके करून त्यांचं सपाटीकरण करून निसर्गाची जी हानी केली जातेय, त्याची झळ मानवाबरोबर इतर वन्यजीवांना ही भोगावी लागतेय. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांत उरण वायू प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसर्या क्रमांकावर पोहचलेला आहे. ही बातमी वाचून अजून होळीमध्ये किती वृक्षांचा आपण बळी देणार ? असा सवाल संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
बदलत्या काळात आपण आपल्या वागण्यात जसे बदल करतो तसे विचारात ही बदल घडवण्याची हीच ती वेळ आहे. निसर्गावरचा ताण काही प्रमाणात कमी व्हावा असा या कार्यक्रमा मागील स्पष्ट हेतू असल्याचे फॉनच्या पदाधिकारी सदस्यांनी सांगितले. यावेळी जयवंत ठाकूर, राजेश पाटील, निकेतन ठाकूर, गोरख म्हात्रे, राकेश म्हात्रे, राकेश शिंदे, प्रणव गावंड, दिनेश चिरनेरकर, सृष्टी ठाकूर, रुद्र पाटील आदी फॉन संघटनेचे सदस्य उपस्थित होते.