| पनवेल | प्रतिनिधी |
राज्यात महायुती विरोधात जोरदार लाट असून, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही जनमत आहे. त्यामुळे पनवेलच काय, राज्यातील सरकारचा पराभव करणे शक्य आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस तथा माजी आ. जयंत पाटील यांनी केले. काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. त्यांनी जयंत पाटील यांची शनिवारी (दि. 5) अलिबाग येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जयंत पाटील यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
पनवेल मतदारसंघावर भाजपाची हुकूमशाही, ठोकशाही, लुटारूगिरी, दहशतवाद फोफावला आहे. त्याला छेद देऊन यावेळी पराभवाची धूळ चारण्यासाठी हातात हात देण्याची गरज असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातील भेटीदरम्यान कडू यांच्यासमवेत काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, शेकापचे नेते विजय काळे, पनवेल संघर्ष समितीचे उलवे नोड अध्यक्ष विकी खारकर उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, पनवेलचा विस्तार होत आहे. शहरीकरणाच्या कलेने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांच्याशी चर्चा करताना कांतीलाल कडू यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. कर्नाळा नागरी बँक बुडीत प्रकरणातील ठेवीदारांविषयीसुद्धा ते सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीला यंदा चांगले दिवस असल्याचा त्यांनी दावा केला. महाविकास आघाडी आणि डाव्या विचारसरणीसह मित्रपक्षांची अद्याप बैठक झालेली नाही. बैठक होताच जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, कडू यांनी मांडलेल्या राजकीय मुद्द्यांवर अतिशय परखड आणि सकारात्मक सहकार्याचे भाष्यही त्यांनी केले.
अंतुलेंच्या आठवणी जागवल्या!
या चर्चेच्या वेळी डॉ. भक्तीकुमार दवे यांच्याशी बोलताना जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए.आर. अंतुले यांच्या आठवणी जगावल्या. तसेच डॉ. दवे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेने चौकशी केली. कुटुंबातील सदस्यांविषयीसुद्धा माहिती घेतली.
विजय काळेंची कृतज्ञता
विजय काळे यांनी जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीत केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.