पर्यटकांना खुणावतोय वावेचा धबधबा

| तळा | वार्ताहर |
तळा तालुका डोंगराळ निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने पावसाळी धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूरपासून पश्‍चिमेला तळा शहराकडे येताना 12 कि.मी.ला डाव्या बाजूला वावे धबधबा लागतो. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच मुसळधार कोसळून तळा तालुक्याला झोडपले. त्यामुळे तालुक्यातील नदया, तलाव, विहिरी तसेच धबधबे तुडुंब भरून वाहत आसून, वावे येथील फेसाळयुक्त पाण्याचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे.

जोरदार पावसामुळे वावे धबधबा पांढर्‍याशुभ्र फेसाळयुक्त रंगात धो धो वाहत आहे.धबधब्याच्या आजूबाजूला हिरवेगार मनमोहक निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली दृश्य पहायला मिळते. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्वरांचा किलबिलाट, बहरलेली वृक्षवल्ली, धबधब्यातील पाण्याचा खळखळाट आवाज यामुळे पर्यटक देहभान हरपून आनंद लुटतात. सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा उत्तम असल्याने मुंबई, पुण्यापासून पर्यटक या धबधब्याला भेट देतात. तळा शहरापासून जवळच असल्याने तरुणाईचं या धबधब्याकडे विशेष आकर्षण आहे.

गेली दोन वर्षे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या धबधब्यावर पर्यटकांना येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. परंतु, यावर्षी कोणतेही नियम लागू नसल्याने पर्यटकांना या फेसाळयुक्त धबधब्यावर मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटता येणार आहे. जवळच वावे गाव असल्याने पर्यटकांना चुलीवरच्या भाकर्‍या, शाकाहारी, मांसाहारी जेवण ऑर्डर दिल्यास बनवून मिळते. यामुळे वावे येथील धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनत आहे.
0000

Exit mobile version