| मुंबई | प्रतिनिधी |
भाजपा केवळ जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील. कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत येणार नाही. त्यामुळे त्यांना काही वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे. वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा, म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहोत, असा एल्गार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्या अपत्य प्रेमामुळे फुटले. भाजपाने पक्ष फोडले नाहीत, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हल्लाबोल केला होता. यावर बोलताना, अमित शाह यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कपमधील अंतिम सामना हरला. तसे पुत्रप्रेम मी दाखवलेले नाही. अमित शाह यांचे पक्षातील स्थान काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असे म्हटले होते. ते दोन पक्ष फोडून आलो, त्यामुळे भाजपाने केलेल्या दाव्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. अमित शाह यांची लाज त्यांचेच चेले-चपाटे काढत आहेत. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला, यावर अमित शाह बोलले तर अधिक बरे होईल, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. दरम्यान, सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी बोलताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. खुलेआम गुंडागर्दी सुरू आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खुलेआम सुरू असलेल्या गुंडागर्दी रोखण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.