जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध ; वडगाव ग्रामपंचायतीचे पालकमंत्र्यांना साकडे
| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा एमआयडीसी हद्दीत गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. प्रकल्प झाल्यास त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यास पर्यावरणावर होतील. त्यामुळे आमच्या मुळावर उठणारा हा प्रकल्प आमच्या हद्दीत नको, असा पवित्रा घेत वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले.
गोवंडी येथील जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प रसायनी पाताळगंगा एमआयडीसी हद्दीत (बोरिवली गाव) येणार आहे. या प्रकल्पाला बाद करून इतर योग्य ठिकाणी उभारण्यासाठी योग्य ती चालना मिळत नसल्यामुळे बोरिवली ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, रहिवासी, समाजसेवक, प्रिया असोसिएशनचे पदाधिकारी आदींनी वैजयंती तुषार ठाकूर (उपजिल्हाप्रमुख, उत्तर रायगड, शिवसेना) यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची मुक्तागिरी बंगल्यावर भेट घेतली.
दरम्यान, या प्रकल्पामुळे होणारा पर्यावरणाला धोका, वायू/माती प्रदूषण, मनुष्य/गुरे/मच्छिमारी धोका, पाताळगंगा नदी प्रदूषणबद्दल भीती व्यक्त केली. या प्रकल्पामुळे एमआयडीसीमधील फारमा, फूड, सुगंध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना स्थलांतरित व्हावे लागेल किंवा कायमचे टाळे लागतील, नवीन उद्योग येणार नाहीत. ज्याने रहिवाशांच्या नोकरी/उद्योगावर परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल, ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्री उदय सावंत यांनी समस्या मार्गी लावण्यासाठी पुन्हा चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी वडगाव ग्रामपंचायत सदस्य, रहिवासी, समाजसेवक, प्रिया असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाविरोधात रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रामपंचायतींनी पत्रव्यवहार देऊन विरोध दर्शविला आहे.