आम्हाला तुमचाही पाठिंबा हवा

देवेंद्र फडणवीसांचा थेट शरद पवारांना फोन

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर सध्या राज्याचे लक्ष लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे. मात्र, तत्पूर्वीच उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच भाजपची इच्छा आहे. मात्र, काँग्रेस इंडिया आघाडीकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बी. सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला.

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला होता. उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन केला. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केल्याचे कुठलेही वृत्त नाही. त्यामुळे, फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांना फोन करुन पाठिंबा मागितला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधत आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस मविआतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत ही चर्चा होत असून याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, त्याचाच एक भाग म्हणून फडणवीसांनी ठाकरे-पवारांना फोन केले. खासदार संजय राऊत यांनीही यास दुजोरा दिला आहे.

Exit mobile version