आम्हाला टोल माफ करावा; ग्रामस्थांची मागणी

राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन सादर

। आपटा । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महार्गावरील पनवेल ते कासूदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण पूर्ण झाले असून, खारपाडा पुलावर टोलनाका उभारण्यात आला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर याठिकाणी टोलवसुली करण्यात येणार आहे. तरी, आपटा ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आपटा ग्रामपंचायतीकडून कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, पेण व अलिबाग येथे जाताना आपटा ग्रामस्थांना टोल फ्री केला पाहिजे. कारण, नियमानुसार नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील ग्रामस्थांना टोल फ्री असतो. म्हणून आपटा ग्रामस्थ जेव्हा जेव्हा पेण व अलिबाग येथे जातील, तेव्हा त्यांना टोल माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ व आपटा ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.

कारण, येथील ग्रामस्थांना नेहमीच भाजीपाला, किराणा खरेदी व जिल्ह्यातील कामासाठी अलिबाग येथे जावे लागते. जर टोलवसूल केला, तर नाहक आर्थिक भुर्दंड पडणार आहे. तरी, याबाबत संबंधित विभागाने याची सविस्तर माहिती टोल अधिकारी यांना द्यावी, जेणेकरुन पुढील काळात अडचणी निर्माण होणार नाहीत, अशी विनंती आपटा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version