शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देऊन प्रकल्प आणू

उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही;
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले उत्तर

| अलिबाग | प्रतिनिधी |

शहापूर येथील प्रस्तावित सिनार मास प्रकल्पातील रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीकरिता शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन गुरुवारी विधानपरिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या संदर्भात शुक्रवारी आफण तेथे जाणार आहोत असेही सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामासाठी जमिनीची मोजणी करण्याकरता, प्रशासनाचे अधिकारी अचानकपणे तेथे आले होते. शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता ही मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला होता, व त्यांनी मोजणी बंद पाडली. शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील व सवाई पाटील शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते.

या संदर्भात जयंत पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला, वीस वर्षात कोणताही प्रकल्प शासनाने आणला नाही. साधा दगडही टाकला नाही. त्यावेळी तीन ते चार लाखांनी जमिनी विकत घेतल्या. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही असेही स्पष्ट करून पाटील म्हणाले की, जमिनीची किंमत देण्याबरोबरच रोजगार मिळणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस जमिनीच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे. त्या जमिनीची किंमत आजच्या बाजारभावाने द्या अशी प्रमुख मागणी आहे. सर्वेेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना 50 टक्के भरती करा, जमीन संपादित करीत असताना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे ही भूमिका आहे.

जमीन मोजणी करताना शेतकऱ्यांना पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत व्हायला हवी होती. परंतु पोलीस बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. अशी टीका करून ते म्हणाले की, स्थानिकांना विश्वासात घेऊनच काम करणे आवश्यक आहे. या गावात इंजिनिअरपासून अनेक उच्चशिक्षित आहेत. शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम करणे आवश्यक आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी पाटील यांच्या प्रश्नाला संमती दर्शविली. ते पोलिसांच्या बळाचा वापर करून कंपनी करण्याची अजिबात इच्छा नाही. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जमिनीचा मोबदला देऊनच प्रकल्प आणू, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. शेतकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू या.

Exit mobile version