| रोहा | प्रतिनिधी |
कोकण ही स्वर्गीय अजितदादांची अत्यंत आवडती भूमी होती. येथील कष्टाळू माणसांवर त्यांचे विशेष प्रेम होते. मंत्रिमंडळात काम करताना त्यांनी कोकणाला भरभरून दिले. आज दादा आपल्यात नाहीत, पण त्यांच्या पश्चात रायगड जिल्हा आणि रोह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी भावनिक ग्वाही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
रोहा-अष्टमी नगरपालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. 11 मे राजी करण्यात आले. त्यानंतर डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांना अभिवादन केले. तसेच स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, म्हसळा सभापती बबन मनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर आलेल्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, “रायगड ही स्वराज्याला राजा देणारी ऐतिहासिक भूमी आहे. याच भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करत चवदार तळ्यासाठी सत्याग्रह केला. ही भूमी प्रेरणा देणारी आहे.” तसेच, “आज ज्या विकासकामांचे भूमीपूजन झाले, त्या कामांच्या लोकार्पणासाठी मी पुन्हा नक्की येईन,” असे आश्वासन त्यांनी दिले. भाषणादरम्यान “आदिती माझ्या मुलीसारखी आहे,” असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांच्या भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दादांच्या आठवणींनी सभागृह भारावले
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 4 ऑक्टोबर 2025 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या डॉ. सी.डी. देशमुख शहर सभागृहाच्या लोकार्पणाची ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. ती पाहताना अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू दाटून आले. दादांच्या प्रयत्नांतून रोहा शहरासाठी मंजूर झालेल्या करोडो रुपयांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या विविध कामांची माहितीही ध्वनीचित्रफितीतून दाखविण्यात आली. “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे काम आणि आठवणी कायम जिवंत राहतील,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
