शिवरायांना मानवंदना देऊन नववर्षाची करणार सुरुवात

किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

। महाड । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील शिवभक्त, माणदेश फाउंडेशन आणि अखिल भारतीय शिव महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना मानवंदना देवून नववर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी केले आहे.

गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची आहे. देशमुख म्हणाले, “पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या वाड्यावर 31 डिसेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव, जिजाऊ वंदना, पोवाडा आणि वैचारिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानंतर रायगडावर एक जानेवारीला वक्ते गंगाधर बनभरे यांचे ‘शिवचरित्र आणि आजचे तरुण’ या विषयावर व्याख्यान आणि प्रवचनकार डॉ. सुहास महाराज फडतरे यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर होळीच्या माळ्यावरील शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाधीचे दर्शन व इतर कार्यक्रम होतील. तेथून प्रेरणा घेऊन नववर्षाची सुरुवात होणार आहे. वर्षभराची संकल्पना तेथे मांडून वर्षभर कार्यरत राहण्याची प्रेरणा रायगडावरून मिळते.’’पासलकर म्हणाले, “नववर्षानिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमास मुंबई, सातारा जिल्ह्यासह भोर, वेल्हे, मुळशीसह पुणे जिल्ह्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेघडंबरी, होळीचा माळ, समाधी स्थळ आणि पाचाड येथे सुशोभीकरण केले जाते. समारोपानंतर पाचाड येथे शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.’’

Exit mobile version