“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील पर्डी क्रमांक 74 ‌‘अ’ या 4.22 गुंठे जमिन मालकाचे नाव सातबाऱ्यावर चढविण्यासाठी तब्बल 1 लाख रूपयांची लाच मागणारा अधिकारी गजाआड झाला. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या तक्रारीमुळे मंडल अधिकारी गोवर्धन माने 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला. परंतु, केवळ महसूल विभागात हा भ्रष्ट्राचार नाही, तर पनवेल तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. पनवेल तालुक्यातील बापजाद्यांच्या कमाईतून मिळवलेल्या जमिनीवर सरकारी अधिकाऱ्यांचा डोळा असून, शेकडो अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तुंबड्या भरल्या आहेत. काम फुकट करण्याची जबाबदारी असलेले अधिकारी प्रत्येक काम पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत, असा आरोप निलेश पाटील यांनी शुक्रवारी (दि.22) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच, आमच्या हक्काच्या कामासाठी पैसे का द्यायचे, असा प्रश्न विचारल्याशिवाय गोरगरीब शेतकऱ्यांची कामे होणार नाहीत. पैशासाठी कोणाचे काम अडविले जाणार असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आवाहन निलेश पाटील यांनी केले.

Exit mobile version