विवाहाचे निमंत्रण आता सोशल मीडियावरून

। रायगड । प्रतिनिधी ।

काळाचा महिमा अगाध आहे. त्याच्या पोटात जे गडप होते ते पुन्हा कधी बाहेर येतच नाही. मग त्या प्रथा, परंपरा असोत की अन्य काही. आता हेच बघाना, लग्नपत्रिकांची छपाई आणि वितरण हा विवाह सोहळ्याचा अविभाज्य घटक. नातेवाईकांची यादी तयार केल्यानंतर मिळेल त्या साधनाने गावोगावी पोहोचविणे जिकरीचे काम होते. त्यात वेळही फार जायचा..पण, आता सोशल मीडियाचा जमाना आला. अवघ्या काही मिनिटांमध्ये शेकडो नातेवाईकांपर्यंत पोहोचता येते. वेळ आणि खर्चाची बचत होत असली तरी लग्नपत्रिका वाटपाच्या निमित्ताने नातेवाईकांच्या घरी जाऊन ख्यालीखुशाली जाणण्याचे, मुक्काम करण्याचे दिवस संपले आहेत. आजच्या डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमूल्य बदल घडत आहेत.

ज्या गोष्टींसाठी पैसा आणि वेळ विनाकारण वाया जातो, अशा अनेक गोष्टी आता तंत्रज्ञानाचा वापर करून चुटकीसरशी होत आहेत. यात सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्याच्या प्रथेचा समावेश आहे. धूमधडाक्यात होणार्‍या लग्न समारंभाचा महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वितरित करणे. त्यासाठी खूप धावपळ करावी लागायची. नंतर मुहूर्त आणि त्यानंतरच लग्नपत्रिका तयार करण्याचे काम वधू-वराकडील मंडळींना असायचे..काही वर्षांपूर्वी मुला-मुलींचे वडील लग्नपत्रिका नातेवाईक, स्नेही, आप्तजनांना देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जात होते. मात्र, आता मोबाईलवरून व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यावरूनच निमंत्रण देण्याचा संदेश टाकला जातो. या नव्या पद्धतीमुळे घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याची प्रथा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. एकूणच अलीकडे लग्नकार्यही हायटेक होत आहे.

तंत्रज्ञानामुळे मिटली चिंता
सोशल मीडियावरील विविध अ‍ॅपच्या माध्यमातून दूर असलेले आप्तेष्ट, मित्रपरिवाराला लगेच छापील पत्रिका पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते. पूर्वी लग्न जुळल्यानंतर गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत असे. लग्नाचे दिवस जसे जवळ आले त्यात कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोहोचली नाही, याची चिंता आता मोबाईल क्रांतीमुळे मिटली. .आमच्याकडे लग्नकार्य अमूक-अमूक महिन्यात असून, निमंत्रण पत्रिका वितरित करणे सुरू आहे. मात्र, वेळ कमी असल्याने दूरवरील मित्रमंडळी तसेच काही नातेवाईकांना व्हॉट्स अ‍ॅपवर पत्रिका पाठवून आमंत्रण दिले जाते.
खर्च अन् पैशांची बचत
डिजिटल पत्रिकेमुळे वेळ आणि पैशांसोबतच कागदाचा खर्चसुद्धा वाचतो. पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षणसुद्धा होत आहे. अनेकदा लग्नपत्रिका वाटताना अनेकांचे अपघात होऊन जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु आता डिजिटल पत्रिकेमुळे अशा घटना कमी झाल्या आहेत. पत्रिका संपल्याची तक्रारसुद्धा आता राहिलेली नाही. पूर्वी पत्रिका छपाईसाठी साधारण कुटुंबातील व्यक्तींना दोन ते पाच हजारांचा खर्च तर श्रीमंत व मोठे व्यावसायिक, नोकरदार ,धनदांडगेसुद्धा आपल्या कुवतीनुसार जास्त रकमेच्या व प्रतिष्ठेला शोभतील अशाच पत्रिका छापायचे. परंतु डिजिटल क्रांतीमुळे आता घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याचा पायंडा मागे पडत आहे.
Exit mobile version