चंद्रकला दासरी-संगीता पाटील यांनी गायली गीते
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे आयोजित धवला कार्यशाळेत ज्येष्ठ धवला गायिका चंद्रकला दासरी आणि संगीता पाटील यांनी तब्बल तीन दिवसांचा लग्न सोहळा धवला गीतांमधून सादर केला. आगरी शाला उपक्रमात धवला कार्यशाळेत सहभागी महिलांसमोर लग्न सोहळ्यातील धवला गीते सादर केली. आगरी ग्रंथालय चळवळ आणि कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या माध्यमातून एक दिवसीय आगरी शाला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी आयोजित आगरी धवला कार्यशाळेत ज्येष्ठ धवला गायिका चंद्रकला दासरी आणि संगीता पाटील सहभागी झाल्या होत्या.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे संचलन संगीतकार दया नाईक यांनी केले. आगरी समाजात तीन दिवसांचा लग्न सोहळा असतो आणि त्यात पहिल्या दिवशी उटणे लावणे आणि त्यानंतर हळद समारंभ तसेच तिसऱ्या दिवशी पहाटे लॉन उतरण्यापासून लग्न सोहळ्यानंतर नवरी पाच परतणी जाईपर्यंत विधी साजरे होत असतात. या सर्व विधीमधील कोणकोणत्या प्रकारची धवले असतात. त्याची माहिती चंद्रकला दासरी आणि संगीता पाटील यांनी विविध प्रकारच्या धवला गीते सादर करून दिली. लग्न सोहळ्यातील नवरा आणि नवरी यांना उटणे लावण्याचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात होणारे विधीचे प्रसंगी कोणते धवले गाण सादर होते, ते गीत संगीता पाटील यांनी सादर केले. त्यानंतरच हळद समारंभ ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी नवरा किंवा नवरी गावातील मंदिरात जाऊन येत असताना आणि हळद लावली जात असतानाचे धवला गीत चंद्रकला दासरी यांनी सादर केली. सायंकाळी होणारे मांडव स्थापना आणि त्यानंतर देव बसवण्याचे कार्यक्रम या विधी प्रसंगी होणारे धवले तसेच लग्नाच्या दिवशी पहाटेच्या वेळी उतरले जाणारे लॉन आणि नंतर नवरा किंवा नवरीची तसेच वरमाई यांची होणारी एकत्रित अंघोळीपासून बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम या सर्व विधी प्रसंगी सादर केले जाणारे धवले यांचे गायन या कार्यशाळेत सादर करण्यात आले.
महिलांनी घेतला नाचण्याचा आनंद
लग्न सोहळा पूर्ण झाल्यावर नवरी आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी निघताना गायले जाणारे धवले आणि पाच परतणं आदी सर्व प्रकाराची धवले या धवला कार्यशाळेत सादर करण्यात आली. अनेक धवले गाणी सादर होत असताना महिलांनी नाचण्याचा आनंद देखील घेतला.







