| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पूर्वी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, 27 नोव्हेंबरपर्यंत या यादीत नाव, प्रभाग अथवा इतर माहितीतील त्रुटींबाबत मतदारांनी हरकती नोंदविणे आवश्यक आहे. अन्यथा मतदानाच्या दिवशी अशा तक्रारींना महत्व राहणार नाही.
पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. पनवेल महापालिका क्षेत्रात 5,54,578 एकुण मतदारांचा समावेश असून त्यापैकी 2,59,685 महिला, 2,94,821 पुरुष आणि 72 इतर मतदार आहेत. कळंबोली व खारघर परिसरातील काही मतदारांच्या नोंदीत गोंधळ असल्याची चर्चा होती.
परंतु, गेल्या तीन दिवसांमध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी कळंबोली येथील प्रभाग कार्यालयाला भेट देऊन निवडणूक विभागाच्या कामाचा आढावा घेतला, आलेल्या हरकतींवरील निर्णयानंतर अंतिम यादी घोषणा 5 डिसेंबरला केली जाईल. मतदान केंद्राचे ठिकाण 8 डिसेंबरला प्रसिद्ध केले जाईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 12 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागरिक येथे त्यांची नावे तपासू शकतील प्रभागनिहाय निरीक्षणासाठी उपलब्ध यादी 1 ते 20 प्रभागांच्या याद्या महानगरपालिकेच्या मुख्यालयात तसेच संबंधित प्रभाग कार्यालयात ठेवण्यात आल्या असून, त्याही http://www.panvelmunicipalcorporation.com या संकेतस्थळावर ऑनलाईनही पाहता येतील. हरकत कशी नोंदवावी? स्वतःचे नाव चुकीच्या प्रभागात असल्यास नमुना ‘अ’ मध्ये अर्ज, इतर मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात असल्यास नमुना ‘ब’ मध्ये पुराव्यासह अर्ज, 20 ते 27 नोव्हेंबरदरम्यान कार्यालयीन वेळेतच स्वीकारले जाणार, हरकती राजकीय पक्षाने किंवा एकगठ्ठा स्वरूपात स्वीकारल्या जाणार नाहीत. मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. नागरिकांनी वेळीच आपली माहिती तपासावी. चुकीची नोंद आढळल्यास तात्काळ हरकत दाखल करावी, असे गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका यांनी सांगितले.






