लग्नसमारंभांना महागाईचा विळखा

| रायगड | प्रतिनिधी |

लग्न पाहावे करून, असे सध्याच्या महागाईच्या दिवसांत नक्कीच वर-वधूच्या कुटुंबीयांसाठी मोलाचा सल्ला ठरत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लग्न समारंभात लाखोंचा खर्च करण्यात येत आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे आणि महागाईमध्ये लग्नाच्या खर्चात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्याने प्रत्येक घरातील व्यक्ती ही शहरात नोकरीनिमित्त आहे. लग्नाचा बदलता ट्रेंड खूप प्रभाव पाडत आहे. त्यामुळे लग्न खर्चात नेमकी काट-छाट कुठे करावी, याचा ताळमेळ बसताना दिसत नाही. दिवाळी संपल्यापासून लग्नसोहळे जोमाने सुरू झाले आहेत, मात्र महागाईचा विळखाही अधिकच घट्ट होत आहे. त्यामुळे वर-वधूंच्या खरेदीसाठी आखलेल्या बजेटला महागाईने पूर्णपणे सुरुंग लावला आहे.

बॅण्डबाजा व बग्गीतही 20 ते 25 टक्के दरवाढ झाली आहे. दूध, पनीर, मिठाई, फूलं, कपडे, केटरिंग, फ्लॉवर डेकोरेशन, बॅण्डपथक, डीजे, ऑर्केस्ट्रापर्यंत सर्वांचेच भाव वाढल्याने लग्नाचे अर्थकारण कोलमडल्याचे वधू-वर पिता सांगत आहेत.

कपड्यांत दरवाढ
लग्नाचे बजेट वाढवण्यात चप्पल, वर-वधूसाठी आवश्यक साहित्य महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सोन्याचे दर वाढल्याने दागिन्यांवरही अधिक खर्च करावा लागतो. गतवर्षीच्या तुलनेत कपड्यांच्या दरात 25 ते 30 टक्के दरवाढ झाली. एकंदरीत या वेळी लग्नाचा वाढीव खर्च वर-वधू दोन्ही पक्षांना आर्थिक संकटात टाकण्याचे काम करत आहे.
केटरिंग, बॅण्डही महागले
केटरिंगपासून बँड-बाजावरही अधिकचा खर्च करावा लागत आहे. गतवर्षी 130 रुपये प्लेट मिळणारी भोजन थाळी यावेळी 220 रुपयांवर पोहोचली. पूर्वी बॅण्ड पथकाची बुकिंग 20 हजार रुपयांपर्यंत होत होती. त्यासाठी आता 30 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च होतो. लग्नाच्या दिवशी घरी रात्रभर मुक्कामी राहून बाजा वाजवणाऱ्या दोन-तीन लोकांच्या चमूची बुकिंग आधी दोन ते तीन हजार रुपयांत होत होती, ती यंदा पाच हजारांवर पोहचली आहे.
सजावटीसाठी लाखोंचा खर्च
अवकाळीमुळे यंदा फुलांचे उत्पादन कमी झाले. परिणामी, त्यातही दरवाढ दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत फुलांच्या सजावटीसाठी फुलांवरील खर्च यावेळी 25 ते 30 टक्के अधिक आहे. यासोबतच मजुरीतही वाढ झाली. कुशल कामगाराचे शुल्कही पाचशे रुपये आणि अकुशल कामगारांना चारशे रुपये द्यावे लागतात. वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. विवाह समारंभात उपयोगात येणाऱ्या खुर्चीपासून स्टेज, तंबू आदींच्या भाड्यातही 10 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी दोन लाखांपर्यंत येणारा खर्च आता तीन लाखांवर गेला आहे.
Exit mobile version