आठवडा बाजाराला उन्हाचा तडाखा

| सोगाव | वार्ताहर |

राज्यातील वाढत्या उन्हाचा फटका सर्वांनाच बसला आहे. तापमानात 42 अंशाच्या पेक्षा जास्त वाढ झाल्याने अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील दर रविवारच्या आठवडा बाजारातील असणारी गर्दी रविवारी (दि.26) कडक उन्हामुळे व भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे गर्दी कमी प्रमाणात होती. यामुळे बाजारात शुकशुकाट पसरला होता. यावेळी ग्राहकांविना व्यापारी व किरकोळ भाजी विक्रेते हवालदिल झाले असल्याचे दिसून आले.

राज्यभरात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीमुळे भाज्यांचे दर कडाडल्यामुळे बहुतांश भाज्या 40 ते 50 रुपये पाव किलो दराने विक्री सुरू होती. तर, कोथिंबीरची जुडी तब्बल 50 रुपये दराने विकली जात होती. यामुळे ग्राहक काही अंशी नाराज झाले होते. अशातच आगोटीची लगबग सुरु झाली असल्यामुळे महिला व पुरुष ग्राहकांनी कांदे, बटाटे, लसूण, सुखी मच्छी, कडधान्ये, कपडे, छत्र्या, चपला आदी पावसाळ्यातील गरजेच्या व साठवणूक करणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर ग्राहकांनी उशिरा बाजारात खरेदीसाठी धाव घेतली. यामुळे व्यापारी वर्गाला काही अंशी दिलासा मिळाला.

आज भाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे. यापूर्वी 20 ते 30 रुपये पाव किलो असलेल्या भाज्या आज 40 ते 50 रुपये पाव किलो झाली आहे. तसेच, कोथिंबीरीची 50 रुपये असलेली जुडी आज कशी विकत घ्यायची? आम्हाला परवडत नाही. कमवणार काय आणि विकत काय घेणार, असा प्रश्न पडला आहे. या झालेल्या भाज्यांचे दर आम्हाला परवडण्यासारखे नाही.

स्वप्नाली म्हात्रे, गृहिणी
Exit mobile version