| उरण | प्रतिनिधी |
उरणमध्ये ठिकठिकाणी बेकायदेशीर आठवडा बाजार थाटून बसले आहेत. आणि तेही सरळसरळ हप्ते घेऊन. या बाजारांचे अस्तित्व कायद्याच्या बाहेर असूनही त्यांच्यावर कारवाईचे नाव नाही. याउलट, हे बाजार चोरट्यांसाठी ‘सुरक्षित अड्डे’ बनले असून पोलीस मात्र नुसते तमाशा बघत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.
या अनधिकृत बाजारांमुळे उरणमध्ये गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. घरात कोणी नसताना चोरटे डल्ला मारून लाखोंचे दागिने लंपास करत आहेत. चोऱ्यांची पद्धत पाहता, ही घडामोड सामान्य नाही. ती व्यवस्थित रेकी करून, बाजारातूनच माहिती मिळवून केली जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या बाजारांमुळे फक्त चोरीच नव्हे, तर वाहतूककोंडी, वाद, मारामाऱ्या हे रोजचेच झाले आहे. रस्त्यावर अडथळा, हॉर्नचा गोंगाट आणि पोलिसांचा मूग गिळलेला आळस हे चित्र उरणवासीयांना आता नवे राहिले नाही. पोलिसांना सर्व माहिती असूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही, हेच संशय अधिक गडद करते. उद्या एखाद्या नागरिकाच्या जीवावर उठणारी घटना घडली, तर त्याची जबाबदारी पोलीस घेणार की हप्ते घेणारे, असा संतप्त प्रश्न करत उरणकरांचा संताप उफाळून येत आहे.







