आठवडी बाजार संकल्पना उपयुक्त

रोजगार निर्मितीतून महिला सबलीकरण
। कर्जत । वार्ताहर ।
कोरोनामुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले,लोकांचे रोजगार गेले. अशा परिस्थितीत महिला आठवडी बाजाराची सुरुवात केल्यास तालुक्यातील रोजगार निर्मितीला चालना देऊन देशासमोर एक नवीन आदर्श निर्माण करता येईल. लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देता येईल व खर्‍या अर्थाने महिला सबलीकरणाचा उद्देश सफल होईल, या उद्देशाने अनोख्या आठवडी बाजाराची संकल्पना मांडण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांची नुकतीच कर्जत नगरपरिषद कार्यालय येथे भेट घेण्यात आली.
समाजव्यवस्थेतील मध्यमवर्गीय कुटुंबातील दुर्बल घटकांना आशेचा किरण म्हणून स्वयंसहाय्यता बचतगटाकडे पाहिले जाते. देशातील कोट्यवधी महिलांच्या आर्थिकच नाही तर समग्र भवितव्याला आकार देण्याचे काम बचतगटाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे.
तालुक्यातील स्थानिक बचतगटातील महिला, शेतकरी महिला, आदिवासी व ग्रामीण महिला यांच्या स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणे, स्थानिक लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे,नगरपरिषद हद्दीत एक हक्काची बाजारपेठ निर्माण करून आदर्श निर्माण करणे, ही व अशा प्रकारची अनेक उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतील, असे मत मदर आय फाऊंडेशनचे आशिष लाड यांनी व्यक्त केले. कर्जत नगरपरिषद हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे हद्दीमध्ये सध्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असून तालुक्याची उपलब्ध बाजारपेठही मर्यादित व छोटी असल्याने तालुक्याची एकाच ठिकाणावर खरेदी होते. आठवडी बाजाराच्या माध्यमातून विविध गृहोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात.
याप्रसंगी मदर आय फाउंडेशन कर्जतचे आशिष लाड, धनंजय मोरे, दिनेश बडेकर,सिद्धेश राऊळ,चंद्रशेखर पाटील,ललिता तेलवणे,राजू नेमाडे,सुनंदा लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

बचतगट म्हणजे महिला सक्षमीकरणाची उज्वल दिशा आहे. बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचाविले जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी ही संकल्पना मोलाची ठरेल
सिद्धेश राऊळ

Exit mobile version