। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्रमध्ये काम करणार्या महिला मदतनीस यांना मागील तीन महिने पगार देण्यात आला नाही. याबाबत आपल्या पगाराची मागणी करणारे निवेदन कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. ग्रामीण भागाचे आरोग्य संभाळण्यासाठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्याचवेळी त्या सहा आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत 33 आरोग्य उपकेंद्र असून त्या ठिकाणी आरोग्य कर्मचार्यांना मदत करण्यासाठी मानधन तत्वावर आरोग्य मदतनीस म्हणून स्थानिक महिलांची नेमणूक केली जाते. महिना तीन हजार रुपये महिना मानधन आरोग्य विभाग देत असते. त्या मदतनीस महिला आरोग्य कर्मचारी यांना शस्त्रक्रियापासून लसीकरण आदी सर्व कामांमध्ये मदत करीत असतात.आपले कुटुंब चालविण्यासाठी लिहिता वाचता येणार्या महिला आपल्या कुटुंबाचा आर्थिक भर उचलता येईल म्हणून मदतनीस म्हणून काम करीत असतात.कर्जत तालुक्यात असलेले नेरळ,कळंब, मोहाली,कडाव,आंबिवली आणि खांडस या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिना तीन हजार रुपये मानधनावर 27 महिला जबाबदारी स्वीकारून काम करीत असतात.
मात्र तीन हजार एवढा तुटपुंजे मानधन देखील आरोग्य विभाग देत नाही. मार्च 2022 पासून त्या सर्व महिला मदतनीस यांना मासिक मानधन कर्जत आरोग्य विभागाने दिले नाही.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आरोग्य मदतनीस महिला यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम साबळे यांची भेट घेऊन थकीत मानधन देण्याची मागणी केली.त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांची देखील उपस्थितीत होती. मानधन न मिळालेल्या महिला मदतनीस यांचे प्रतिनिधी म्हणून ज्योस्ना डावरे,कांचन मोरे,संगीता बांगारे,हिरा दुर्गे,ज्योती मते,रेणुका गंगावणे,आदींसह अन्य महिला उपस्थित होत्या. त्यातील ज्योस्ना डावरे या आरोग्य मदतनीस म्हणून 18 वर्षे काम करीत असून देखील त्यांना आणि अन्य सर्व महिला मदतनीस यांना शासनाकडून गणवेश आणि ओळखपत्रे दिली गेलेली नाहीत.
मार्च खरे मुळे सर्व महिला मदतनीस यांचे मानधन आलेले नाही. मात्र आम्ही तात्काळ जिल्हा परिषदकडे नव्याने मागणीचे पत्र सादर केले आहे. या सर्व महिला यांचे काम निश्चित महतवाचे असून त्यांची मानधन न मिळाल्याने झालेली गैरसोय याबद्दल निश्चितच खेद आहे.
-चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी