रायगडात आगोटीची लगबग

आठवडा बाजार हाऊसफुल्ल; किमती वाढण्याचा भीतीने गर्दीत वाढ

| रायगड | प्रतिनिधी |

मॉन्सून सुरू होण्यास अद्याप दोन महिने शिल्लक असले तरी भाववाढीच्या शक्यतेमुळे गृहिणींनी पावसाळी बेगमीसाठी खरेदीची लगबग सुरू केली आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असून, बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.

पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे आठवडा बाजार नियमित भरवणे कठीण होते. त्यामुळे या काळासाठी आवश्यक असलेले कडधान्य, मसाले, सुकामेवा तसेच रामराज, पोयनाड, नागाव , सहाण व वायशेत येथील आठवडा बाजार सर्वांत मोठे मानले जातात. कांदा, लसूण, बटाटे, खोबरे, विविध कडधान्ये आणि सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईच्या वाशी बाजारपेठे प्रमाणेच येथेही घाऊक व स्वस्त भावात वस्तू किरकोळ प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर हे आठवडा बाजार बंद होतात आणि कार्तिकी एकादशी (बोंबल्या विठोबा) नंतरच पुन्हा सुरू होतात. त्यामुळे पुढील पाच ते सहा महिन्यांची बेगमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक या बाजारांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

किमती वाढण्याची भीती
इंधनाचे भाव वाढण्याच्या भीतीने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सुक्या खोबऱ्याचे भावही प्रतिकिलो 300 रु.पर्यंत वाढलेले आहेत. याचबरोबर सर्वप्रकारची कडधान्ये व इतर जीवनावश्यक वस्तू घाऊक किमतीने मिळत असल्याने या बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात.
सुक्या मासळीची हमखास खरेदी
पावसाळ्यात समुद्र आणि खाडीत मासेमारीवर निर्बंध येत असल्याने कोळीबांधवांना मासळी पकडण्यासाठी जाता येत नाही. परिणामी ताज्या मच्छीचा पुरवठा कमी होतो आणि खवय्यांना सुक्या मच्छीवरच समाधान मानावे लागते. यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मच्छीची मोठ्या प्रमाणात साठवण करण्याची परंपरा कायम आहे. अलिबाग तालुक्यातील वडखळ येथील आठवडा बाजार हा सुक्या मच्छी खरेदीसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे स्थानिकांसह बाहेरील शेकडो व्यापारी विविध प्रकारची सुकी मच्छी विक्रीसाठी आणतात. या बाजारात अलीकडेच सुक्या मच्छीची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे दिसून आले.

मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात जास्तीत जास्त पावसाळी बेगमी साठवण्याचा प्रयत्न असतो, परंतु मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या अनुभवावरून आम्ही लवकरात लवकर बेगमीसाठी धावपळ करीत आहोत. त्याचबरोबर किंमत वाढण्याची जास्त शक्यता आहे.

हिना बामणे,
गृहिणी
Exit mobile version