फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे खोपोलीत जंगी स्वागत

। खोपोली । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स भारतभर, सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य आणि बंधुभाव वृध्दींगत करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत.या फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे खोपोलीत जंगी स्वागत करण्यात आले.

पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या या फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे खोपोलीत आगमन होताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र हातनुर, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी, खेलो इंडिया अभियानातील खेळाडू तसेच स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल यांच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

फ्रीडम रायडर बाईकर रॅलीचे संस्थापक अध्यक्ष तथा समन्वयक हर्षल मोदी यांनी यावेळी आपल्या मनोगतात माहिती देताना हा 75 दिवसांचा हा प्रवास असून 15 ते 34 राज्यातून 21,000 किलोमिटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत असे सांगितले. आपण या स्वागताने भारावून गेल्याचे देखील यावेळी त्यांनी कबूल केले.

जुन्या पुणे- मुंबई राष्ट्रीय मार्गावरून प्रवास करत असताना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाच्या प्रांगणात या रॅलीतील बाईकर्सचे पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बाईकर्सनी विद्यार्थ्यांसमवेत आपले अनुभव शेअर करून फोटोसेशन देखील केले. सर्व वयोगटातील बाईकर्समध्ये महिलांचा समावेश होता. अत्यंत शिस्तबद्धरीत्या मुंबईकडे प्रस्थान करत असताना सर्वांनी देशभक्तीपर घोषणा देत रॅलीला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version