नव्या चिमुकल्यांचे शाही स्वागत
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद नवघर शाळेत मंगळवारी (दि.24) ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ अभियानांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झालेल्या नव्या दमाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाची नवी गुढी उभारण्यात आली.
यावर्षी इयत्ता पहिलीसाठी एकूण 8 विद्यार्थी दाखलपात्र होते, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या पालकांसह शाळेत उपस्थित राहून औपचारिक प्रवेश घेतला. पहिल्याच दिवशी मुलांच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षकांनी या चिमुकल्यांना पुष्पगुच्छ, खाऊ आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. आपल्या नवीन शाळेतील हे स्वागत पाहून मुलांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर फुले आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आल्यामुळे शाळेला एखाद्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच, शाळेत तयार करण्यात आलेला सेल्फी पॉईंट या कार्याक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. या ठिकाणी पालकांनी आपल्या पाल्यांसोबत फोटो काढून हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक संगिता बैकर या होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून नवीन विद्यार्थ्यांचे शालेय कुटुंबात स्वागत केले. उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी, ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभियानाचे महत्त्व पालकांना पटवून दिले. तसेच, जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषद शाळेच्या दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विषयशिक्षिका वृषाली गुरव, उपशिक्षक शीतल पाटील, रुपाली लेंडवे आणि श्वेता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, गावपातळीवर पट नोंदणी वाढवण्यासाठी हा एक सकारात्मक पुढाकार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
शिक्षणमंत्री यांच्या संकल्पनेतून नुकतेच ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे अभियान सुरू झाले आहे. नवघरमधील नवीन दाखल मुलांचे प्रवेश वाढावेत, यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– राजेंद्र अंबिके, आयडॉल शिक्षक, नवघर
