उत्साह आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देत जल्लोषात नव वर्षाचे स्वागत केले. सकाळपासून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले होते. फटाक्यांची आतषबाजीत एकमेकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नव वर्षाच्या स्वागताची झिंग पहाटेपर्यंत सुरु होती.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्र किनारी तसेच माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग फुल झाले आहेत. विशेष करुन रेस्टाॅरंट, हॉटेल आणि कॉटेजेसमध्ये नव वर्षासाठी डिजे पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे रात्रभर पार्ट्या झोडण्यात पर्यटक चांगलचे दंगून गेले होते. काही ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणीही पर्यटकांसह स्थानिकांनी हजेरी लावली होती. अबाल-वृध्दांनीही अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत गाण्याच्या तालावर ते थिरकले. काही आयोजकांनी पर्यटकांसाठी पोपटी पार्टीचा बेत आखला होता. मासळी, चिकन, मटणावर त्यांनी चांगलाच ताव मारला. नाताळनंतरही पर्यटकांची गर्दी कायम होती. त्यामुळे रायगड चांगलेच फुलून गेले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांचा मुक्काम राहणार असून काही पर्यटक हे नव वर्षात दाखल होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क होत्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तब्बल एक हजाराहून अधिक पोलिस रस्त्यावर तैनात करण्यात आले होते.

Exit mobile version