। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातली सिग्नल यंत्रणा वर्षाच्या पूर्व संध्येला सुरू करून अलिबाग नगरपरिषदेने नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. नव वर्षाला पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळे होणारी कोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना सिग्नलचे नियम पाळून वाहने चालवावी लागणार आहेत. अन्यथा पोलिसांकडून दंड कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अलिबाग शहर हे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. यासाठी अलिबाग नगरपरिषदेने महावीर चौक आणि अशोका कॉम्प्लेक्स या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे बंद अवस्थेत होती.
नव वर्षाला मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबाग मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेने बंद अवस्थेत असलेली महावीर चौकातील सिग्नल यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित केली आहे. तर अशोका कॉम्प्लेक्स येथील यंत्रणा अद्याप बंद आहे. सिग्नल सुरू झाल्याने वाहन चालकांना शिस्त लागणार आहे.