महेश देशपांडे
अर्थविश्वातल्या काही ताज्या बातम्यांमधून विकास आणि मर्यादांची कल्पना आली. अर्थकारण कोलमडत असल्याने अलिकडेच ट्विटरवर कार्यालयातील सामान विकण्याची वेळ आली. त्याच वेळी निफ्टी 21 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज समोर आला. दरम्यान, चीनबरोबर भारताचा व्यापार बहरला असल्याचं दिसलं. याखेरिज शेतकर्यांमुळे सरकारला दररोज एक कोटींचा फटका बसत असल्याचे वृत्तही समोर आले.
सरत्या आठवड्यात अर्थविश्वातल्या काही बातम्या चर्चेचा विषय ठरल्या. त्यातून विकास आणि मर्यादांची दिशा पहायला मिळाली. पहिली लक्षवेधी बातमी म्हणजे ट्विटरवर कार्यालयातील सामान विकण्याची वेळ आली. त्याच वेळी निफ्टी 21 हजारांचा टप्पा गाठणार असल्याच तज्ज्ञांचा अंदाज ऐकायला मिळाला. दरम्यान, सीमेवर आगळीक करणार्या चीनबरोबर भारताचा व्यापार बहरला असल्याचं दिसलं. याखेरिज घुसखोरी करणार्या शेतकर्यांमुळे सरकारला दररोज एक कोटींचा फटका बसत असल्याचं वृत्तही समोर आलं.
ट्विटर ही जगातील दुसर्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची कंपनी. तिने अलिकडे सॅनफ्रान्सिस्कोच्या मुख्य कार्यालयाचे भाडे भरलेले नाही. कंपनीने जगभरातील इतर कार्यालयांचे भाडेही भरलेले नाही. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मालमत्तांच्या मालकांना भाडे मिळालेले नाही. परिणामी, इमारत मालक ट्विटरला मालमत्ता रिकामी करण्यास सांगत आहेत. काही प्रकरणांमध्ये, जमीनमालक ट्विटरला लीज करारानुसार मालमत्ता रिकामी करण्यास सांगत आहेत. ते ट्विटरकडून थकीत भाड्याची मागणीही करत नाहीत. ट्विटरने साडेसात हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकल्याचे आणखी एका मालमत्ता मालकाचे म्हणणे आहे. कंपनीला आता बहुधा मोठ्या कार्यालयाची गरज नाही. अनेक कार्यालयांमध्ये स्वयंपाकघराची जागा ठेवलेली नाही. कंपनी स्वयंपाकघरातील वस्तूंचा लिलाव करत आहे. कर्मचारी कपात केल्यानंतर स्वयंपाकघराची गरजच उरणार नाही, असे कंपनीचे मत आहे. मस्क यांनी भाडे न देणे हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मॉडेल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत अनेक ठिकाणी मालमत्ता भाड्याने घेतल्या; परंतु त्यापैकी बहुतेकांचे भाडे त्यांनी दिले नाही.
दुसरीकडे कंपनीतून काढून टाकलेल्या एका कर्मचार्याचे म्हणणे आहे की, त्याला कायद्यानुसार तीन महिन्यांचा पगारही दिला गेला नाही. काही कर्मचारी ट्विटरविरुध्द कोर्टात केस दाखल करण्याच्या पर्यायांचाही विचार करत आहेत. मालमत्तांच्या मालकांच्या संपर्कात असलेल्या कर्मचार्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले. कोलोरॅडोमध्ये ट्विटरला आपली मालमत्ता भाड्याने देणारे बिल रेनॉल्ड्स यांनी सांगितले की, आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मालमत्ता मालकांच्या ट्विटरवरील सर्व संपर्क अधिकार्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. अशा स्थितीत त्यांच्याशी आणि त्यांच्यासारख्या अनेकांशी ट्विटरवर संपर्क साधता येत नाही. मालमत्ता रिकामी करण्याबाबत ट्विटर ई-मेलला प्रतिसाद देत नाही. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्कवरील आर्थिक संकट गडद होत आहे. त्यांनी याआधीही अनेकांना ट्विटरवरून काढून टाकले आहे. त्याच वेळी, मस्क गेल्या काही दिवसांपासून आपल्या इलेक्ट्रॉनिक कार कंपनीचे, टेस्लाचे शेअर्स विकत आहेत. मस्क यांनी अवघ्या तीन दिवसांत ‘टेस्ला’चे सुमारे 22 दशलक्ष (2.22 कोटी) शेअर्स विकले आहेत. त्याची किंमत सुमारे 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच 29.81 हजार कोटी रुपये आहे. मस्क म्हणाले, ‘मी माझा व्यवसाय वाचवण्यासाठी ‘टेस्ला’चे शेअर्स विकत आहे.’ टेस्ला शेअर्स या वर्षी साठ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला ते चारशे डॉलरच्या आसपास किंमत मिळवत होते. आता ते दीडशे डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत.
दरम्यान, नवीन वर्षात शेअर बाजार उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बाजारात सातत्याने चढउतार होत आहे. बाजारात उच्चांकी आणि नीचांकी लाट येत आहे. वास्तविक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसने शेअर बाजाराविषयी विश्वास वर्तवला आहे. या सर्वांच्या दाव्यानुसार, पुढील वर्षी सर्वच क्षेत्रांमध्ये तेजी दिसून येत असल्याने निफ्टी 21 हजार दोनशे अंकाचा स्तर सहज गाठेल. ‘आयसीआयसी सिक्युरिटीज’ या ब्रोकरेज हाऊसने दावा केला आहे की, येत्या काळात बाजारातील अस्थिरता कमी होईल. विदेशी गुंतवणूकदार येत्या काही दिवसांमध्ये अधिक गुंतवणूक करतील. पुढील वर्षी बँकिंग, मेटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तेजी दिसून येईल. येत्या काळात भारत फोर्ज, हिंदाल्को, माईंड ट्री, एमसीएक्स, एसबीआय, सन फार्मा या कंपन्या जास्त परतावा देतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात हा गुंतवणुकीचा सल्ला नाही तर एक अंदाज आहे. अलिकडच्या काळात गुंतवणूकदारांना बाजारातील चढउताराचा फायदा झाला आहे. त्यांना प्रॉफिट बुक करता आले आहेत. यापूर्वी 2015, 2018, 2020 मध्ये असा प्रकार समोर आला होता. तसाच फायदा आता होण्याची शक्यता आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये प्रथमच, निफ्टी विक्रमी उच्चांकाच्या जवळ असला तरी गुंतवणूकदारांना त्याचा हवा तसा फायदा घेता येत नसल्याचे दिसून येते. विशेषत: बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल ‘निफ्टी’ला धक्का देण्याची शक्यता आहे. त्यामुळे निफ्टी 21 हजार दोनशे अंकांचा पल्ला सहज गाठू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याच सुमारास चीनची ‘सीमेवर आगळीक तर व्यापारात घुसखोरी’ या तत्वानुसार घूसखोरी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जमिनीवर हक्क सांगणार्या चीनने भारतीय व्यापारात प्रचंड घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकार आणि व्यापारी संघटनांनी चीनकडून आयात घटल्याचा दावा केला होता; पण परिस्थिती तशी नाही. चीनसोबत व्यापारी तूट वाढल्याचा दावा करण्यात येत होता; पण चीन आणि भारतादरम्यानचा द्विपक्षीय व्यापार एक तृतीयांश वाढला. गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकार चीनकडील आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. केंद्र सरकारने चीनी उत्पादनावर आयात शुल्कही वाढवले होते. तसेच काही मालावर करही वाढवला होता; पण तरीही आकडेवारीमधून भारतीय व्यापारविश्वात चीनची घुसखोरी वाढल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी समोर आली. त्यानुसार मार्च 2022 पर्यंतच्या बारा महिन्यांमध्ये भारत आणि चीनमधील एकूण व्यापार 34 टक्क्यांनी वाढला. तो आता 115.83 दशलक्ष डॉलर झाला आहे. या आर्थिक वर्षात सुरुवातीच्या सात महिन्यांमध्येच व्यापार वाढला आहे. मोदी सरकारने चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना आखली होती. 2020 मध्ये सरकारने व्यापार आणि व्यवसायावर अंकुश लावला होता. भारतात तयार होणार्या वस्तूंवर चीनमध्ये मोठे आयात शुल्क लावले होते; पण चीनसोबतचा व्यापार कमी करण्याची योजना यशस्वी झाली नाही. याउलट, आशियातील या मोठ्या उत्पादकाकडून भारतात आयात वाढली आहे.
या समस्येप्रमाणेच पंजाबमध्ये एक समस्या वाढताना दिसत आहे. पंजाबमधील शेतकरी अलिकडे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि इतर मागण्यांबाबत ते धरणे धरून बसले आहेत. या आंदोलनांमुळे सरकारचा दररोज एक कोटींहून अधिकचा महसूल बुडत आहे. धरणे धरून बसलेल्या पंजाबच्या शेतकर्यांनी राज्यातल्या नऊ जिल्ह्यांमधल्या 18 रस्त्यावरील टोलनाके बंद केले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील बारा टोल नाक्यांचा आणि सहा राज्य महामार्गावरील सहा टोलनाक्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते की, राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझा बंद झाल्यामुळे दररोज 1.33 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, शेतकर्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीबाबत पंजाब सरकारला इशारा देण्यात आला आहे. टोलनाके बंद झाल्यामुळे होणार्या तोट्यामुळे राज्यातील भविष्यातील विविध प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी येणार असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सध्याचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे सांभाळणेही अवघड होणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी राज्यातील नऊ जिल्ह्यांमधले 18 टोलनाके बंद केले होते. यातील अमृतसर, तरनतारन, जालंधर, होशियारपूर आणि फिरोजपूर या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा आहेत. टोल मिळत नसेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर संबंधित कंपन्यांना नुकसानभरपाई द्यावी लागते. किमान आधारभूत किमतीव्यतिरिक्त मनरेगाअंतर्गत मजुरी वाढवणे, धानाच्या पर्यायी पिकांना हमीभाव या मुद्द्यांवर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.