अफगाणिस्तान हा मागास देश आहे. गरीब तर तो आहेच. पण विचारांमध्येही कंगाल आहे. सध्या तिथे तालिबानी सत्तेत आहेत. तालिबानी एके-47 रायफल्स, ड्रोन्स, रॉकेट लाँचर्स वापरतात. ही सर्व शस्त्रे विसाव्या शतकात शोधली गेली. पण हातात ही शस्त्रे असली तरी त्यांचे डोके पंधराव्या शतकातलेच आहे. दुसर्या टोळीतल्या माणसांना खलास करायचे असते एवढेच त्यांना ठाऊक आहे. संसद, न्यायालये, वृत्तपत्रे अशी व्यवस्था ते मानत नाहीत. बंदूक ही त्यांच्यासाठी सर्वोच्च व्यवस्था आहे. इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणचे नाव ते घेतात. पण खरं तर त्याच्या आडून ते स्वतःचाच कायदा चालवतात. नुकतीच त्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली. मुली आता केवळ प्राथमिक शाळेत शिकू शकतील. अशी बंदी असलेला तो जगातील एकमेव देश आहे. मुस्लिम धर्म, कुराण यांना मानणारे जगात असंख्य देश आहेत. तेलसंपन्न अरब देशांपासून ते आफ्रिकेतील मागास देशांपर्यंत. त्यातील काहींमध्ये सक्तीचा बुरखा वगैरे बंधने आहेत. पण महिलांना शिकूच द्यायचे नाही असे कोठेही नाही. उलट, प्रेषित मुहम्मदांनी ज्ञान मिळवणे हे सर्व मुस्लिम स्त्रीपुरुषांचे कर्तव्य आहे असे म्हटले होते, असे म्हणतात. प्रेषितांची पत्नी आयेशा ही धर्मविषयक बाबींमध्ये विद्वान मानली जाई. हदीथवरचे तिचं निरुपण हे उच्च कोटीचं मानलं जातं. तालिबानी जे करू पाहत आहेत त्याला कुराण किंवा प्रेषितांची संमती नाही असं स्पष्ट मत अनेक जाणत्यांनी नोंदवलं आहे. खुद्द अफगाणिस्तानमध्ये 1990 मध्ये महिला साक्षरतेचं प्रमाण उत्तम होतं. देशातील चाळीस टक्के डॉक्टर्स, साठ टक्के प्राध्यापक आणि सत्तर टक्के शाळेतील शिक्षक या महिला होत्या. पण तालिबान्यांशी आज कोणीही वाद घालू शकणार नाही. कारण, त्यांच्या हातात बंदूक आहे. आणि आपल्या हातात बंदूक आहे म्हणजेच आपले बरोबर आहे असा त्यांचा समज आहे. त्यांना दुसरा मोठा बंदूकवाला भेटल्याशिवाय त्यांचे डोके ताळ्यावर येणार नाही. किंबहुना, ते कधीच येणार नाही. कारण, दुसर्या बंदूकवाल्याशी मारामारीत हे डोकं मारलं जाण्याचीच शक्यता अधिक आहे. गेल्या वर्षापूर्वी पंधरा ऑगस्टला त्यांनी काबूलवर कबजा केला. त्यापूर्वी ते बराच काळ परागंदा होते. कतार, दुबई अशा ठिकाणी राहत होते. अनेक जण परदेशी विद्यापीठात शिकलेले होते. त्यामुळे हे तालिबानी आधीच्यांपेक्षा वेगळे असतील असं अनेकांना वाटत होतं. तालिबान्यांनीही सुरुवातीला महिलांवर बंधने आणणार नाही असं म्हटलं होतं. पण शेवटी वळणाचं पाणी वळणाला गेलं. सार्वजनिक ठिकाणी वावरण्यावर, नोकर्या करण्यावर आणि आता शिकण्यावर बंदी आली. भारत हा अफगाणिस्तानच्या कितीतरी पुढे आहे. संपत्तीने आणि विचारानेही. आपल्याकडे अजून तरी संसद, न्यायालये, वृत्तपत्रे इत्यादी हयात आहेत. त्यांना प्रतिष्ठा आहे. त्यामुळे बहुतांश भारतीयांना तालिबानी कसे तयार होत असतील हे कळत नाही. भारतात कधी तालिबान्यांसारखे लोक सत्ता गाजवू शकतील असं त्यांना वाटत नाही. पण असा विचार करणारांनी थोडं थांबायला हवं. आजूबाजूला पाहायला हवं. उदाहरणार्थ, पठाण सिनेमाच्या वादात स्वतःला हिंदू साधू म्हणवणारा असं म्हणाला की, शाहरुख खान कधी भेटलाच तर मी त्याला जिवंत जाळीन. प्रज्ञासिंग या भाजपच्या खासदार आहेत. साध्वीबाईंनी परवा कर्नाटकात असंच वक्तव्यं केलं. हिंदूंनी सुरे परजून तयार ठेवावेत असं त्या म्हणाल्या. गंमत अशी आहे की, कर्नाटकात आणि दिल्लीत सरकार आहे भाजपचं. दिल्लीतील अमित शाह हे तर साक्षात लोहपुरुष आहेत. तरीही प्रज्ञाबाईंना भीती कशाची वाटते हा एक प्रश्नच आहे. बहुदा पोलीस, न्यायालय या कशावरच त्यांचा भरवसा नसावा. हातात बंदूक असल्याखेरीज आपण जगू शकणार नाही असं तालिबान्यांना वाटतं. तसंच सुरे तयार ठेवले नाहीत तर आपण वाचणार नाही असं यांना वाटतं. शाहरुखला जाळू पाहणारा साधू किंवा प्रज्ञा यांचं म्हणणं अनेकांना पटतं. तरीही हे लोक अल्पमतातच आहेत. त्यांची संख्या वाढली आणि भरपूर बंदुका जमा झाल्या की येईलच की दिल्ली ताब्यात. तिकडे अफगाणिस्तान. इकडे भारत.