वेस्ट इंडिजची विजयी सलामी

। गयाना । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत रविवारी (दि.2) दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यु गिनी संघात झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 5 गडी राखुन विजय मिळवला. यासह वेस्ट इंडिजने या स्पर्धेच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. या सामन्यात पापुआ न्यु गिनीने वेस्ट इंडिजसमोर 137 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिजने 19 षटकात 5 गडी गमावत पूर्ण केला.

137 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजसाठी सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी दुसर्‍याच षटकात सलामीवीर जोन्सन चार्ल्सची शुन्यावर विकेट गमावली. त्यानंतरही विंडिजच्या खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचणी येत असल्याचे दिसले. तरी पहिल्या विकेटनंतर ब्रेंडन किंग आणि निकोलस पूरन यांनी संयमी खेळ करत अर्धशतकी भागीदारी केली होती. अखेर ही भागीदारी जॉन कारिकोने तोडली. त्याने पूरनला 27 धावांवर बाद केले. यानंतर ब्रेंडन किंगला कर्णधार असाद वालाने 34 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल (15) आणि शेरफेन रुदरफोर्ड (2) झटपट बाद झाल्याने वेस्ट इंडिज दबावात आले होते. परंतु, अखेरीस रोस्टन चेसने आंद्रे रसेलला साथीला घेत आक्रमक खेळ केला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 19 व्या षटकात विजय निश्‍चित केला.

Exit mobile version