हजारो बळी घेणार्‍या रस्त्याचे पुन्हा कसले सोहाळे

शेकाप नेतेे पंडित पाटील यांची टीका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एक दशकाहून जास्त कालावधी पूर्ण व्हायला लागलेल्या आणि हजारो बळी घेतलेल्या मुुंबई गोवा महामार्गाचे पुन्हा भूमिपूजन करावे लागते हीच नामुष्की आहे. तरी त्याचे सोहाळे कसले साजरे करता असा जळजळीत सवाल करीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. तसेच इंदापूर तळा आगरदांडा, माणगाव म्हसळा दिघी या अर्धवट असलेल्या रस्त्यांचे उद्घाटन करणे हे देखील केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अशोभनीय असल्याची टीकादेखील पंडीत पाटील यांनी केली आहे.

पंडित पाटील यांनी म्हटले की, मोठा गाजावाजा करीत केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा रविवारी पार पडला. मात्र सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हायला दशकाहून अधिक कालावधी लागला. हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी लाजिरवाणेच आहे. सदर रस्त्यासाठी तत्कालिन खासदार अनंत गीते यांनी प्रयत्न केले असल्याने या कामासाठी त्यांना बोलावणे उचित ठरले असते अशी आठवण देखील यावेळी त्यांनी केली. त्याचप्रमाणे यावेळी सुधारणा केलेल्या इंदापूर-तळा-आगरदांडा, माणगाव-म्हसळा-दिघी पोर्ट या दोन रस्त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. मात्र हे दोनही रस्ते सध्या अपूर्ण अवस्थेत आहेत याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेली दिसत नाही. माणगाव-म्हसळा-दिघी पोर्ट या रस्त्यावरील वेळास या गावानजिक असलेल्या घाट रस्त्यात जवळपास 500 मीटरचा रस्त्याची अतिशय दुरवस्था आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण झाला असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कसे करु शकते असा सवाल पंडित पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मोर्बा जवळ देखील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. इंदापूर-तळा-आगरदांडा रस्त्याची देखील अशी अवस्था असल्याचे पंडित पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणा हस्तांतरण करण्यासाठी आपण प्रयत्न केला असल्याचेही पंडित पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version