। अलिबाग । अतुल गुळवणी ।
महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा शिवसेना (ठाकरे) गटातील प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी 10 मे रोजी पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची जोरदार चर्चा महाड शहर आणि परिसरात सुरु आहे.या बदलत्या राजकीय समीकरणामुळे महाड,पोलादपूर तालुक्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.आम्ही शिवबंधन बांधणार हे निश्चित, मात्र सध्या ज्या तारखा जाहीर होतात त्या सोशल मिडियावरुन व्यक्त केलेले तर्कवितर्क असून,अद्याप पक्षप्रवेशाची निश्चित तारीख ठरलेली नसल्याचे काँग्रेस नेते हनुमंत जगताप यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.
माजी आम.माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल यांनी माणिकरावांच्या आकस्मिक निधनानंतर तालुक्यातील नेतृत्वाची सुत्रे आपल्या हातात घेतली आहे.यासाठी त्यांना त्यांचे काका हनुमंत जगताप यांचे मार्गदर्शन मिळत आहे.राज्यात सत्तांतर झाल्यावर जगताप काका,पुतणीने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.ती सदिच्छा भेट होती असे उभयतांकडून सुचित करण्यात आले.मात्र त्यानंतर परिस्थितीचा एकूण अंदाज घेत स्नेहल जगताप यांनी ठाकरेंचे शिवबंधन बांधून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.यासाठी येत्या 10 मे रोजी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.तो महाडमध्येच होण्याची शक्यता आहे.त्यानिमित्ताने महाडमध्ये शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
स्नेहल जगताप यांच्यारुपाने ठाकरे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक नवा चेहरा उपलब्ध होणार आहे.शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांना यानिमित्ताने शह देण्याचा प्रयत्न ठाकरे गटातर्फे केला जाणार आहे.अर्थात यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.कारण आतापर्यंत माणिकराव जगताप यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस असाच झाला होता.शिवसेना हाच त्यांचा मुख्य विरोधक राहिलेला होता.आता नवीन समिकरणामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून काम करताना त्यांना काँग्रेस,राष्ट्रवादीशी जुळवून घ्यावे लागणार आहे.अर्थात याचा फायदा कितपत होतो हे निवडणुकीतील निकालावरुनच स्पष्ट होणार आहे. सध्या महाडच्या सोशल मिडियावर मात्र स्नेहल जगताप यांच्या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली हे निश्चित.
कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय -जगताप
विद्यमान राजकीय परिस्थितीत आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊ,हे काही चुकीचे नाही.पण जाण्यापूर्वी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ,असे मत काँग्रेस नेते हनुमंत जगताप यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केले.अजून पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झालेली नाही.सध्या ज्या काही तारखा जाहीर होतात त्या सोशल मिडियावरुनच व्यक्त केलेेल तर्कवितर्क असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.तालुक्यात अजूनही ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अस्तित्व आहे.त्यात आमची जोड मिळाल्याने ही ताकद आणखी वाढेल,असा विश्वाही जगताप यांनी व्यक्त केला.जगताप कुटुंबियांचा राजकीय प्रवास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेस असा झालेला आहे.आतापर्यंत शिवसेना हाच आमचा मुख्य विरोधक होता.पण आता शिवसेनेचे विभाजन झालेले आहे.त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेशी आम्ही जुळवून घेऊ,असेही ते म्हणाले.आमच्या या पक्षप्रवेशाने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होणार नाहीत.कारण राज्यात आता तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून काम करीत आहेत.शिवाय गेल्या अनेक वर्षांचे या दोन्ही पक्षांशी असलेले व्यक्तिगत संबंध या पक्षांतरामध्ये आड येणार नाहीत,असा दावाही जगताप यांनी केला आहे.