2019 चे विश्वविजेते, 2022 चे ट्वेंटी-20 क्रिकेटचे विश्वविजेते जेव्हा; भारतात सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषकासाठी दाखल झाले तेव्हा रूबाबात वावरत होते. अहमदाबादला, विश्वचषक 2023 च्या न्यूझीलंडविरूद्ध सलामीच्या लढतीच्या वेळी इंग्लंडच्या कप्तान जोस बटलरला प्रश्न विचारला गेला. विश्वविजेतेपद तुम्ही कसे ‘डिफेंड’ करणार? त्यावेळी उपहासाने बटलर म्हणाला, आम्ही काहीही ‘डिफेंड’ करणार नाही, आक्रमणच करणार! वेगळ्या अर्थाने विचारलेल्या प्रश्नाचे इंग्लंडच्या कप्तानाचे उत्तर अरेरावी दर्शविणारे होते.
‘बाझ बॉल’च्या नावाखाली गेले दोन हंगाम इंग्लंड आणि जवळपास हैदोस घालणाऱ्या इंग्लंड संघाला भारतातील विश्वचषकही तसाच वाटला. त्यांनी निसर्ग, वातावरण, खेळपट्ट्या, हवामान याचाही आदर न ठेवताच मग्रुरपणे उत्तर दिले. इंग्लंडचे गर्वाचे घर अल्पावधीतच खाली झाले. गत विश्वविजेत्यांना नवी दिल्लीत अफगाणिस्ताननेच पराभूत केले. जो संघ अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावला देखील नाही. त्या संघाने इंग्लंडला हरविले. अपयशाचा तो डोस पचवितात न पचवितात तोच मुंबईत वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने तर इंग्लंडचे पुरते वस्त्रहरण केले. इंग्लिश गोलंदाजीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवित दक्षिण आफ्रिकेने 399 धावा कूटल्या. इंग्लंडकडे ‘बाझ बॉल’ क्रिकेटचे सर्व शिलेदार असतानाही, त्यांचा 170 धावात खुर्दा उडाला. ‘असं का झालं? इंग्लंड संघ मुंबईत का हरला?
मुळातच इंग्लंड संघ हे विसरला होता की, आपण वेगळ्या हवामानात खेळायला आलो आहोत. जेथील विविध केंद्रावरील भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल. ऑक्टोबर ‘हीट’चा फटका स्थानिक भारतीयांनाही बसतो. मग तेथे इंग्लिश क्रिकेटपटू काय चीझ आहेत. मुंबईच्या सामन्यासाठी इंग्लंड संघ साडेअकराच्या सुमारास वानखेडे स्टेडियमकडे निघाला असेल. त्याआधी खेळाडू हॉटेलच्या वातानुकुलित वातावरणात होते. त्यांचे शरीर बाहेरच्या उष्ण वातावरणाशी जुळलेले नव्हते. सामन्याआधीच्या सरावासाठी जेव्हा इंग्लंड संघ मैदानात रणरणत्या उन्हात उतरला. सुमारे दोन ते सव्वा दोन तास खेळाडूंनी उन्हातच सराव केला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने अशा असह्य होणाऱ्या उकाड्यातच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भलेमोठे, लॅपटॉप्स आणि आधीची आकडेवारी घेऊन बसलेल्यांनी इंग्लंडचा आणखी घात केला. वानखेडेच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करून जिंकणे सोपे असल्याचा गत इतिहास सांगतो. मात्र ते सामने कोणत्या हंगामात खेळविलेले होते?. आयपीएलचा अनुभव असणाऱ्या इंग्लिश क्रिकेटपटूंनी तर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिला. मात्र हे खेळाडू, प्रशिक्षक व अन्य सुज्ञ मंडळी हे विसरली की हे मुंबईतील हवामान आहे. मुंबईची उष्णता वेगळी, भारताच्या अन्य भागातील उष्णता वेगळी. मुंबईत येणारा घाम स्नायूदुखीची समस्या निर्माण करू शकतो. अधिक थकवू शकतो. इंग्लंडच्या खेळाडूंची या हवामानात सकाळपासून दमछाक झाली.
आयपीएलच्या वेळी सामनेच मुळात सायंकाळी, सूर्य मावळला की सुरू होतात. येथे धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकतो कारण दुसऱ्या डावात, उशिरा रात्री दव अधिक पडायला लागतो. त्यामुळे चेंडू अधिक ओलसर व जड होतो. तो बॅटवर सरळ येतो, त्या चेंडूचा स्वींग आणि स्पीन थांबतो. फलंदाजी अधिक सोपी होत जाते. विश्वचषकाचे सामने 2 वाजता सुरू होतात. त्यामुळे जवळजवळ निम्म्याहून अधिक षटके झाली तरीही दुसऱ्या डावात दव पडायला सुरूवात होत नाही.
इंग्लंडच्या अपयशाचे आणखी एक कारण म्हणजे, संघव्यवस्थापन यातील बदल, अँड्य्रू स्ट्रॉस हा हुशार कप्तान होता, फलंदाज होता. त्याची आणि इंग्लंडच्या कप्तान इअन मॉर्गन यांची जोडी 2015 ते 2019 या कालावधीत जुळली होती. दोघेही एकाच ‘वेव लेंथवर’ होते. 2019 नंतर व्यवस्थापन बदलले. कोविडमुळे घडी बसलेली इंग्लिश क्रिकेटची व्यवस्था थंडावली. कोविडनंतर देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला असुरक्षित वाटायला लागले. त्यानंतर जगभरात आता उगवलेल्या अनेक ट्वेंटी-20, टि-टेन, हंड्रेड आदी लिगमुळे व्यावसायिक क्रिकेटपटूंचे आयुष्य बदलले. देशाच्या संघासाठी करारबद्ध होऊन आपले स्वातंत्र्य गमाविणे क्रिकेटपटूंना नुकसानकारक वाटायला लागले. स्वतःला कोणत्याही व्यावसायिक स्पर्धांसाठी मोकळे ठेवण्याकरीता खेळाडूंनी आपले लक्ष्य बदलले. त्यामुळेही इंग्लंड संघाचे नुकसान झाले.
Email: vinayakdalvi41@gmail.com