खासदारांनी पाच वर्षात कोणती कामे केलीः पंडित पाटील

| पेण | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी आज पेण येथील इंडिया आघाडीच्या कार्यालयाला भेट देऊन प्रचार कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेल्या 5 वर्षात सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांना आम्हीच निवडून दिले. आम्हाला आशा होती की रायगड जिल्ह्यातील अनेक प्रलंबित असलेले प्रश्‍न ते निकाली काढतील. परंतु, त्यांनी एकही रायगड जिल्ह्याचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

मुंबई-गोवा महामार्ग आजही अपुर्‍या स्थितीत आहे. बाळगंगा धरण प्रकल्पात बधित शेतकर्‍यांचे पुनवर्सन, खारेपाटातील सिंचन, रोजगार, प्रदुषण, पर्यटन यासारखे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून त्यांना एकही प्रश्‍न मार्गी लावता आला नाही. गेल्या पाच वर्षात तटकरे यांनी कोणती कामे केली त्यांनी ते जनतेसमोर आणावी. लांबपल्ल्याची एकही गाडी त्यांना रायगडमध्ये थांबवता आली नाही. आता पुन्हा त्यांच्या आश्‍वासनामध्ये तेच प्रश्‍न आणि तिच आश्‍वासने अहेत. नवा गडी नवे राज्य असे वाटले होते. परंतु, नवा गडी राज्य मात्र जुनेच आहे. आज तटकरे कामगार पक्षाला हिणवतात छोटा पक्ष पण या छोट्या पक्षाच्या जोरावरच आपण खासदार झाला होतात. याचा विसर त्यांना पडला आहे. आता हा छोटा पक्षच आपल्याला खासदार होऊ देणार नाही. रायगड जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीवर चालणारा जिल्हा आहे. कोणत्याही लाटेवर हा जिल्हा चालत नाही. असे शेवटी सांगून अनंत गीते हेच (दि.4) जूनला फटाके वाजवतील आणि गुलाल ही उधळतील.असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत शेकापचे माजी सभापती महादेव दिवेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, जोहे सरपंच सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version