। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोठ-मोठया घोषणा करणार्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणार्या वडखळ अलिबाग रस्त्याचे चौपदरीकरणाला मुहूर्त कधी मिळेल असा सवाल शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी केला आहे.
गेले अनेक वर्षांपासून रखडलेल्या वडखळ अलिबाग रस्त्याचा प्रश्न पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, नितीन गडकरी रायगडात आले होते, त्यावेळी अलिबाग-वडखळ रस्त्यासाठी शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मागणी केली होती. त्यासाठी जयंत पाटील यांनी पाठपुरावा करुन केंद्र सरकारकडून योजना मंजुर करुन घेतली. प्रत्यक्षात मात्र भूसंपादन करावे लागणार्या जमिनीची किंमत जास्त असल्याने आणि कामासाठीचा निधी कमी असल्याने सदर काम थांबवले गेले. त्यामुळे हा महामार्ग रखडला असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणले. राज्यात रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा असून त्याच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता चार पदरी नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रस्ते विकास महामंडळ एकेका रस्त्यासाठी कोटयवधी रुपये खर्च करुन चार चार रस्ते तयार करते. पण ज्या जिल्ह्यातून हजारो कोटींचा महसूल सरकारच्या तिजोरीत पडते. त्या जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण चार पदरी रस्त्याने जोडले जाऊ नये याचे आश्चर्य वाटते. नितीन गडकरी यांच्या दौर्यावेळी आपल्याला अपेक्षा होती की, गडकरी या रस्त्याची घोषणा करतील. प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली. पनवेल हून वडखळ यायला 30 मिनीटे लागतात. आणि वडखळहून अलिबागला जायला दिड ते दोन तास लागतात. जनता या त्रासापासून कधी मुक्त होईल असा प्रश्न देखील पंडीत पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले की, वसई विरार कॉरिडोअर होईल तेंव्हा होईल, पण महाराष्ट्रात एकमेव रायगड जिल्हा आहे जो अजूनही चारपदरीने जोडलेला नाही. बाकी महाराष्ट्रातील सर्व रस्ते चार पदरी रस्त्याने जोडलेले आहेत. मग रायगडचे रस्ते कधी चार पदरीने जोडले जातील. आणि अलिबागवासीयांचे दुःख कधी दुर होणार? नागपूर मुंबई समृद्धी रस्त्यासाठी आवश्यकता नसताना जादा दराने तुम्ही जमीन घेतली मग इथे का जमीन खरेदी करु शकत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.