प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांचा सरकारला सवाल
| चाणजे | वार्ताहर |
नवी मुंबई, पनवेल येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि.29 डिसेंबर रोजी पहिले विमान उतरले. मात्र, विमान उतरले तरी अजूनपर्यंत विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली नसल्याने लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांना पडला आहे.
ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे, ते ठिकाण लोकनेते दि.बा.पाटील यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. येथूनच ते सहा वेळा आमदार व दोन वेळा खासदार म्हणून निवडून या भागाचे लोकप्रतिनिधीत्व केले आहे. तळागाळातील उपेक्षित दुर्गम भागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शाळा काढल्या, गावोगावी फिरून भात गोळा करून शिक्षकांचे पगार केले. विशेष म्हणजे, पनवेलमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात अर्ध्या रायगड जिल्ह्यातील मुलांची उच्च शिक्षणाची सोय झाली. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे ते तारणहार आहेत. साडेबारा टक्के विकसित भूखंडाचा कायदा करून तमाम प्रकल्पग्रस्तांचे कल्याण केले आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही सरकारांनी औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्याचा एकमुखी ठराव घेऊन तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. या प्रस्तावानुसार केंद्र सरकारने छत्रपती संभाजी नगर व धाराशिव या नावांना मंजुरी दिली. मात्र, लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावावर केंद्र सरकारने अजूनपर्यंत शिक्कामोर्तब केले नाही. यामुळे केंद्र सरकारची याबाबत नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांना पडला आहे.