| उरण | प्रतिनिधी |
उरणच्या द्रोणागिरी नोडपासून गावोगावी युवकांच्या आयुष्याशी खेळणारा सोनू माफिया आजही मोकाट फिरत आहे. नशीली पदार्थांची खुलेआम विक्री करून कोट्यवधींचा काळा धंदा करणाऱ्या या नराधमावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, ही उरणकर जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी शोकांतिका आहे.
पनवेल रेल्वे स्थानकात निष्पाप बाळाच्या आडून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन महिलेस अमलीपदार्थ नियंत्रण विभाग बंगळुरूच्या विशेष पथकाने 35 कोटींचा ड्रग्ज जप्त करून अटक केली. ही घटना जणू सोनूच्या ‘बिझनेस मॉडेल’चा आरसा बनून समोर आली आहे. कारण अशा प्रकरणांमुळे उरणसह कोकणात नशेचे जाळे किती खोलवर रुजलंय, हे स्पष्ट होत आहे. सोनू नावाचा हा माफिया सुरुवातीला एका टपरीवरून पान विक्री करत होता. गुटख्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून त्याने नशेचा डाव मांडला आणि आता तो द्रोणागिरी नोडमध्ये ‘बिग बॉस’सारखा राहत आहे. पान टपरीच्या आडून गांजा, चरस, गुटखा, ब्राऊन शुगर यांची विक्री करत त्याने लाखोंचा धंदा उभारला आहे. आधी गुन्हे दाखल, जेलची हवा, तरी धंदा सुरूच आहेत. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सोनूने नशीली व्यापारातून कोट्यवधींचे गाळे व सदनिका खरेदी केल्या आहेत. त्यामुळे या ड्रग्ज माफियाला संरक्षण कोणाचं? पोलीस, राजकीय नेते, की स्वतः यंत्रणाच गुंगीची शिकार झालीय? तसेच, सोनू माफियावर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल उरणकरांमधून होत आहे.







