जिंदाल रुग्णालयातील डॉक्टर्सवर कारवाई कधी; ऐनघर ग्रा.पं.ची विचारणा

| नागोठणे | वार्ताहर |

सुकेळी येथील बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रूग्णालयातील वादग्रस्त दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणार्‍या पत्राला कोणतेही अधिकृत लेखी उत्तर जिंदाल रुग्णालय व्यवस्थापनाकडून 12 दिवसांनंतरही ऐनघर ग्रामपंचायतीला देण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्याने तक्रार केलेल्या या डॉक्टर्सवरील कारवाई अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांतून उलटसुलट चर्चा होत आहे.

जिंदाल रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ परमार व डॉ. कृतिका परमार या डॉक्टर जोडगोळीबद्दल रुग्णांकडून छोट्या-मोठ्या तक्रारी होत आहेत.त्याचे प्रत्यंतर उपसरपंच रोहिदास लाड यांनाही आल्याने त्यांनी याबाबत रितसर तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली होती.

दोन्ही डॉक्टर्सना त्वरित हटविण्याची मागणी सरपंच कलावती राजेंद्र कोकळे व ग्रामविकास अधिकारी राजू डेरे यांच्या सहीनिशी रुग्णालयास बजावण्यात आलेल्या एका लेखी तक्रारीनुसार करण्यात आली होती.

मात्र याप्रकरणी जिंदाल व्यवस्थापनाकडून कोणती कारवाई करण्यात आली याचे उत्तर अद्याप ग्रामपंचायतीला देण्यात आलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी जिंदाल रुग्णालय व्यवस्थापनाला स्मरणपत्र पाठविण्यात आल्याची माहिती ऐनघरचे ग्रामसेवक राजू डेरे यांनी दिली. तर जिंदाल रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जयरमण नडार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर डॉ. कृतिका परमार यांना लगेचच नोकरीतून कमी करण्यात आले असून डॉ. गोपाळ परमार यांच्यावरील कारवाईसाठी संबधित अर्ज जिंदालच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडूनच पुढील कारवाई करण्यात येईल असे नडार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version