| पेण | प्रतिनिधी |
पेण शहराच्या सर्वांगीण प्रगतीची महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे भोगावती नदी. परंतु, आज भोगावती नदीला सर्व बाजूने प्रदूषित करण्याचा विढाच जणू काही पेणकरांनी उचललेला आहे.
पेण शहर हे फक्त सुनियोजित शहर नसून, ते ऐतिहासिक शहर असल्याने पेण शहराची गटार व्यवस्था ही अगदी 16 व्या शतकापासून आहे त्या स्थितीत आहे. मात्र, पेण शहर हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि भविष्यात तिसर्या मुंबईचे केंद्रस्थान असल्याने गेल्या 15 ते 20 वर्षांत पेण शहराचे शहरीकरण दामदुपटीने वाढले आहे. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्थादेखील (गटार व्यवस्था) योग्य नाही. एक काळ असा होता की, पेण शहराला पाणीपुरवठा हे मोतीराम तलावामधून होत होता आणि मोतीराम तलाव हाच एक मुख्य स्त्रोत पाणीपुरवठा पेणकरांचा होता. त्यातच पेणमध्ये वाडा संस्कृती असल्याने प्रत्येकाच्या स्वतःच्या विहिरी असल्याने नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा व्हायलाच हवा, असा काही अट्टाहास नव्हता. त्यामुळे जी जुनी गटार व्यवस्था होती, ती गटार व्यवस्था कायम राहिली. परंतु, शहरीकरणाचा लोंढा एवढा वाढला की, वाडा संस्कृतीचा र्हास होउन आज मोठ मोठाली सिमेंटची जंगले झाली आहेत. त्यामुळे कालपरत्वे विहिरीचे अस्थित्व नाहीसे झाले. पेणकरांना भोगावती नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. गेली 4 ते 5 दशके पेणकरांना भोगावती नदीमधूनच पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गटार व्यवस्था ही जुनीच असल्याने पाटणोली ग्रामपंचायतची हद्द वगळता सर्व सांडपाणी भोगावती नदीमध्ये सोडले जात आहे आणि त्याच भोगावती नदीमधून पेणकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. आजच्या स्थितीला पेणशहरात दोन जलशुध्दिकीकरण केंद्र आहेत. हे दोन जलशुध्दिकीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालल्यास 11 ते 11.5 एमएलटी पाणी शुध्द होते. मात्र, झपाट्याने झालेल्या शहरिकरणाला हे पाणी पुरेसे नाही. आताच्या घडीला पेणला 17 ते 18 एमएलटी पाण्याची गरज आहे. परंतु, नगरपालिकेने कितीही ठरवले तरी एवढे पाणी पुरवठा करणे नगरपालिकेला सध्या तरी शक्य नाही.
आज शुध्द पाण्याच्या नावाने मोठया प्रमाणात राजकारण केले जात आहे की, पेण शहराला शुध्द पाणी मिळावे ही माफक कल्पनादेखील नागरिकांची चुकीची नाही; परंतु एकंदरीत सध्याचा विचार करता पेणकरांना सध्यातरी थांबावे लागेल एवढे निश्चित. असे असताना पेणकर भोगावती नदीचे पाणी जास्तीत जास्त प्रदूषित कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. कारण, भोगावती नदीच्या आंबेघर पुलावर गेल्यास एक विदारक दृश्य पहायला मिळते. ते म्हणजे, पुलाच्या रेलींगला मोठ्या प्रमाणात केरकचर्याच्या पिशव्या अडकलेल्या दिसत आहेत. एकीकडे शुध्द पाणी मिळत नाही म्हणून पेणकर मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पहायला मिळतात. तर, दुसरीकडे स्वतःच भोगावती नदीचे पाणी दूषित कसे करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात.
पेणकरांच्या या विरोधाभास वागण्यामुळे आज भोगावती मोठया प्रमाणात प्रदूषित होत आहे. शासन केव्हा निधी उपलब्ध करून देईल तेव्हा पेण येथील गटार व्यवस्था योग्य करून भोगावतीचे पाणी शुध्द केले जाईल. परंतु आजच्या स्थितीला पेणकरांच्या हातात काही गोष्टी टाळण्यासारख्या आहेत. परंतु पेणकर टाळत नाहीत, हा खर्या अर्थाने पेणकरांचा दोष आहे. भोगावती नदीचे पाणी जर पेणकर पीत असतील, तर त्यांना याचे भान ठेवावेच लागेल की, भोगावती नदीमध्ये आपल्या घरातील केरकचरा, निर्माल्य नदीत नेऊन टाकणे हे चुकीचे आहे.