‘या’ आरोग्य पथकास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा केव्हा मिळणार?

मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या काशिनाथशेठ पांडुरंग कुलकर्णी आरोग्य पथक दवाखान्याला पन्नास-साठ वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त न झाल्याने यशवंतनगर पंचक्रोशीतील सुमारे पंचवीस हजारांहून अधिक जनतेच्या आरोग्याची परवड सुरुच आहे.

यशवंतनगर पंचक्रोशीतील नांदगावसह मजगाव, उसरोली, वावे, वांद्रे वेळास्ते, विहुर, काशिद ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब जनतेच्या आरोग्यरक्षणासाठी नांदगाव येथे सदर आरोग्यपथकरुपी दवाखाना कार्यरत असून, तेथे एक डॉक्टर, एक मिश्रक, दोन-तीन परिचारिका व सफाई कामगार असा कर्मचारी वृंद काम करीत आहे. जवळपास शंभरापर्यंत दररोजची ओ.पी.डी आहे. प्रारंभी ते नांदगावगावात एका भाड्याच्या इमारतीत होते परंतु नांदगावमधिल एक समाजसेविका श्रीम. वत्सलाबाई चिटणीस व त्यांचे कुटुंबीय गजानन व भालचंद्र कुलकर्णी यांनी वत्सलाबाईंचे बंधु कै. काशिनाथशेठ पां. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीचे बांधकाम करुन इमारत रायगड जिल्हा परिषदेच्या 25 मार्च 1979 रोजी ताब्यात दिली. सदर जागेत डॉक्टर व अन्य कर्मचार्यांसाठी स्वतंत्र खोल्यांही बांधण्यात आल्या आहेत. तेव्हापासून गेली चाळीस वर्षे हे आरोग्यपथक या इमारतीत रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. परंतु, त्यास अद्याप प्राथमिक आरोग्यकेंद्राचा दर्जा प्राप्त न झाल्याने एमबीबीएस डॉक्टरसह अन्य कर्मचारी, यंत्र सामुग्री, आवश्यक सर्जरी व औषधे आदी बाबतीत काही मर्यादा पडत आहेत.

सध्या कोरोनामुळे देशासह राज्यातील शासन जनतेच्या आरोग्यावर अधिक लक्ष देत असल्याने पालकमंत्र्यांनी सदर आरोग्य पथकाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच याकामी रायगडचे खासदार सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांनीही आपले योगदान द्यावे, अशी मागणी मुरुड तालुका पत्रकार संघातर्फे त्यांना देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version