| उरण | वार्ताहर |
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेवर आहे. आता नगरपालिका, जिल्हा परिषदव पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. एकीकडे यापुढे सर्व निवडणुका महाविकास आघाडी मार्फत लढविल्या जाणार असल्याचे वरिष्ठ नेतेमंडळी सांगत आहेत. परंतु उरणमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनोमिलन कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. उरण शहरातील अनधिकृत बांधकामे, 2 महिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होऊन एक वर्षाचा अवधी उलटूनही कोणावरही कारवाई झाली नाही किंवा विरोधी महाविकास आघाडीने ही या दुर्दैवी दुर्घटना व अनधिकृत बांधकामा बाबत कोणत्याही प्रकारचा आवाज उठविण्यापेक्षा दडपण्यात धन्यता मानली, अनधिकृत टपरी धारक, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, थकीत पाणीपट्टी, विजेचा लपंडाव काँक्रीटीकरण रस्त्यांची दुरवस्था, गेली अनेक वर्षे बांधकाम सुरू असूनही ती अपूर्ण अवस्थेत आहेत, परवानगी न घेता बांधकामे, मासळी मार्केटला निधी उपलब्ध होऊन ही काम सुरू नाही, वृक्षारोपण निधी हडप, एनएनएमएमटी शहराच्या बाहेर अशा अनेक समस्यांचा सामना उरणच्या जनतेला करावा लागत असतानाही विरोधक गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उरणमध्ये काही ग्रामपंचायतमध्ये भाजपा शिवाय शिवसेना नेत्यांना करमत नाही. काही शिवसेना पदाधिकार्यांनी भाजपाला अंतर्गत पाठबळ देण्याची तयारी आगामी निवडणुकीसाठी केली असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख कोणताही आदेश देवो तो आम्हाला बंधनकारक नसल्याचे उरणमधील भाजपाबरोबर उठबस करणारे पदाधिकारी एक प्रकारे संदेश देत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजीचा सूर निघत आहे. उरणमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडीला जिंकायचे असेल तर त्यासाठी आधी उरणमधील महाविकास आघाडीतील नेत्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणूक जिंकणे कठीण होणार असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.







