डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनामागील सूत्रधारांना केव्हा पकडणार?

रायगड अंनिसचा शासनाला सवाल
अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला 20 ऑगस्ट रोजी आठ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? असा सवाल करत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे रायगड जिल्हा अंनिसने शुक्रवारी केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे आणि मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केलेले आहे. तर, अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपीविरुद्धही सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखलच केलेले नाही. या खूनाचा तपास डॉ. विरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत थांबलेला आहे. या खूनामागील सूत्रधार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांनी शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अंनिस रायगडचे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, जातीअंत विभाग राज्य सदस्य निलेश घरत, महिला विभाग राज्य सदस्य मीना मोरे, मंदाकिनी गायकवाड, श्‍वेता सुभेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version